बाप रे.....साठ फूट खोल विहिरीत पडलेल्या बैलाला क्रेनने काढले बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 12:35 PM2021-07-12T12:35:58+5:302021-07-12T12:36:03+5:30
गुळवंचीतील घटना : डब्लूसीए, ॲनिमल राहतचे बचाव कार्य
सोलापूर : गुळवंची गावातील एका साठ फूट खोल विहिरीत बैल पडला होता. या बैलाला बेल्ट लावून क्रेनच्या साह्याने उचलण्यात आले. डब्लूसीए (वाइल्डलाइफ काँझर्वेशन असोसिएशन), ॲनिमल राहत संस्थेच्या संयुक्त बचाव कार्यामुळे विहिरीत पडलेल्या बैलाला मिळाले जीवदान मिळाले.
रविवार ११ जुलै रोजी सकाळी गुळवंची तांडा येथील एका सार्वजनिक विहिरीमध्ये गोशाळेमधील एक बैल (वळू) पडल्याची माहिती सागर राठोड यांनी डब्लूसीएचे सोलापूरचे सदस्य संतोष धाकपाडे यांना दिली. माहिती मिळताच डब्लूसीएची टीम गुळवंची तांड्याकडे रवाना झाली. तिथे जाऊन पाहणी केली असता, एका ६०फूट खोल विहिरीमध्ये बैल पडल्याचे दिसून आले. सकाळपासून बैल विहिरीतच असल्यामुळे आणि त्याच्या मागच्या डाव्या पायाला जखम झाल्यामुळे तो चवताळला होता.
बैलाची सुटका करण्यासाठी दोन्ही टीम सज्ज झाल्या. त्यावेळी गावकऱ्यांकडून एक क्रेन मागविली. सुरेश क्षीरसागर, डॉ.दीपक घोडके सदस्य हे बैलाची सुटका करण्यासाठी विहिरीमध्ये उतरले. त्यांनी बैलाला बेल्ट लावला. क्रेनच्या साह्याने बैलाला अलगद उचलण्यात आले. या बचाव कार्यामध्ये डब्लूसीएचे सुरेश क्षिरसागर, संतोष धाकपाडे, सोमानंद डोके, अजित चौहान, विनय गोटे यांनी सहभाग घेतला. ॲनिमल राहत संस्थेचे डॉ.महेश क्षीरसागर व दीपक घोडके यांनी बैलावर प्राथमिक उपचार केले. बैलाला नियंत्रित करण्यासाठी हरी तोडकरी आणि बेल्टसाठी धनंजय काकडे यांचे विशेष सहकार्य केले.
गोंजारल्यामुळे चवताळलेला बैल झाला शांत
उंचावरून विहिरीत पडल्यामुळे बैलाच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला वेदना झाल्या होत्या. सुरेश क्षीरसागर, डॉ.दीपक घोडके हे विहिरीमध्ये उतरले असता बैल चवताळला होता, पण सुरेश क्षीरसागर, डॉ.दीपक घोडके यांनी बैलाला गोंजारून, त्याच्या पाठीवर हात फिरविल्यावर बैल शांत झाला. त्यानंतर, त्याला बेल्ट लावून क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले.
..आणि गावकऱ्यांनी वाजविल्या टाळ्या
विहिरीत पड़लेल्या बैलाला बाहेर काढण्यासाठीची मोहीम जवळपास दोन ते अडीच तास चालली. यासाठी सर्वांनीच परिश्रम घेतले. क्रेनच्या साह्याने बैलाला विहिरीच्या बाहेर काढताच, गुळवंची तांड्यातील रहिवाशांनी टाळ्या वाजवून आभार मानले. विहिरीच्या वरती आलेल्या बैलाची सुखरूपपणे सुटका करून परत गोशाळेमध्ये त्याची रवानगी करण्यात आली.