विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या चेअरमनपदी बबनराव शिंदे चौथ्यांदा बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:26 AM2021-03-01T04:26:00+5:302021-03-01T04:26:00+5:30
विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या चेअरमन व व्हा. चेअरमनपदाच्या निवडीसाठी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. कारखाना कार्यस्थळावर नूतन संचालक मंडळाची ...
विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या चेअरमन व व्हा. चेअरमनपदाच्या निवडीसाठी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. कारखाना कार्यस्थळावर नूतन संचालक मंडळाची निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा निबंधक कुंदन भोळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची सभा बोलावली होती.
या सभेस रमेश येवले-पाटील, सुरेश बागल, पोपट गायकवाड, अमोल चव्हाण, नीळकंठ पाटील, शिवाजी डोके, लक्ष्मण खुपसे, विष्णू हुंबे, प्रभाकर कुटे, भाऊराव तरंगे, रणजितसिंह शिंदे, लाला मोरे, वेताळ जाधव, सचिन देशमुख, विक्रमसिंह शिंदे, पांडुरंग घाडगे, पोपट चव्हाण, सिंधुताई नागटिळक, संदीप पाटील या संचालक मंडळासह कार्यकारी संचालक एस. आर. यादव, सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. बिनविरोध निवडीनंतर नूतन चेअरमन आ. बबनराव शिंदे,व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांना सुरक्षा अधिकारी एम. एस. दुंगे यांच्या नेतृत्वाखालील सुरक्षापथकाने मानवंदना दिली.
३० दिवसांत ऊसबिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
चेअरमन, व्हा. चेअरमन निवडीनंतर झालेल्या पत्रकार परिषेदेत बोलताना आ. बबनराव शिंदे म्हणाले, एफआरपी, एसएमपी हे कायदे आल्याने साखर कारखानदारी अडचणीतून जात आहे. त्यामध्ये विठ्ठलराव शिंदे एकमेव कारखाना असा आहे की, तीस दिवसांत ऊसबिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे. सध्या ३० जानेवारीपर्यंतचे पेमेंट जमा केले आहे. फेब्रुवारीचे पेमेंटही लवकरच देण्यात येईल. सध्या दोन हजार रुपये उचल देत आहोत. उर्वरित एफआरपीची रक्कम, पोळा व दिवाळी यासाठी दोन टप्प्यांत देत आहोत. विठ्ठलराव शिंदे कारखान्यात ११.२० टक्के रिकव्हरीप्रमाणे १५ लाख मे. टन उसाचे गाळप केले आहे. सर्व उसाचे गाळप केल्यानंतरच कारखाना बंद केला जाईल, असे त्यांनी सांगितले.