५७ तास ३५ मिनिटांसाठी जन्मले होते ते बाळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:31 AM2018-04-15T11:31:55+5:302018-04-15T11:31:55+5:30
सोलापूरात दोन तोंड असलेल्या बाळांचा जन्म, माता-पित्यांची बांधिलकी, वैद्यकीय अभ्यासासाठी केले बाळाचे देहदान
विलास जळकोटकर
सोलापूर : लाखात एखादं जुळं बाळ जन्मण्याची घटना सोलापूरच्या शासकीय रुगणालयामध्ये गुरुवारी घडली. अशा दुर्मिळ बाळाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले, मात्र त्याच्या आयुष्याची दोरी अल्पायुषी असावी. गुरुवारी १० वाजून १५ मिनिटांनी जन्मलेलं हे बाळ आज शनिवारी सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी मृत्यू पावलं. म्हणजे ५७ तास ३५ मिनिटे हे बाळ जगलं.
या बाळाच्या आई-वडिलांना यापूर्वीच धक्का बसलेला. आज त्याच्या जाण्यानं दुसरा धक्का बसला, पण अशा स्थितीतही या माता-पित्यांनी डॉक्टर आणि स्नेहीजनांच्या समुपदेशाने काळजावर दगड ठेवून देहदान केले. आपल्या बाळाच्या देहाचा उपयोग नव्या पिढीच्या डॉक्टरांना संशोधनासाठी व्हावा, हा त्यामागचा हेतू. पालकांच्या या औदार्याबद्दल रुग्णालयातील प्रशासनानं विशाल दृष्टिकोनाबद्दल आभार मानले.
गोदुताई विडी घरकूल क परिसरात राहणारे मोबीन अब्दुल शेख आणि रजिया शेख हे सामान्य स्थितीत आपली उपजीविका करणारं कुटुंब. गुरुवारी शासकीय रुग्णालयात रजिया यांच्या पोटी दोन डोकी, एक धड असलेलं हे बाळ जन्मलं. या कुटुंबीयांच्या दृष्टीनं हा धक्काच होता. डॉक्टरांनी त्यांना दिलासा दिला. रुग्णालयामध्ये नवजात शिशू अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू केले. यासाठी २४ डॉक्टरांचे पथकही तैनात होते.
बाळाची स्थिती चिंताजनक असली तरी त्यांच्यावर विशेष दक्षता घेण्याच्या सूचना अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी दिलेल्या होत्या. बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. शाकिरा सावस्कर, सहयोगी प्रा. डॉ. सुदर्शन चक्रे आदी मंडळी देखरेख करीत होती. पण अथक प्रयत्नांनंतरही हे बाळ वाचू शकलं नाही. अडीच दिवसांनंतर म्हणजे गुरुवारी १० वाजून १५ मिनिटांनी जन्मलेल्या या बाळानं शनिवारी सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.
सारेच नि:शब्द झाले. यात सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या माध्यमातून डॉक्टरांनी त्या बाळाचे आई-वडील, आजोबा अनीश खरादी यांच्याशी संवाद साधला. जन्मलेल्या बाळाचा दफनविधी करण्याऐवजी नव्या पिढीच्या डॉक्टरांना संशोधनाच्या, अभ्यासाच्या दृष्टीने देहदानाचा प्रस्ताव ठेवला.
गेल्या दोन दिवसांत घडलेल्या अनपेक्षित घटनांनी गोंधळून गेलेल्या बाळाच्या आई-वडिलांचे सांत्वन करून बाबा मिस्त्री यांनी समजावून सांगितल्याने ते तयार झाले. पोटचं पोर कसंही असो त्याच्याबद्दल आई-वडिलांना आत्मीयता असतेच. पण त्यांनी काळजावर दगड ठेवून देहदानास होकार दर्शविला, ही सामाजिक परिवर्तनाची बाब म्हणावी लागेल.
माता-पित्यांचे योगदान मोलाचे
- मृत्यू पावलेलं हे बाळ पालकांनी सारे सोपस्कार पूर्ण करून शरीररचना विभागाकडे सुपूर्द केले. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने हे उपयुक्त ठरणार आहे. बाळाच्या आई-वडिलांनी याचे दफन न करता उदात्त हेतू ठेवून आपल्या पोटच्या गोळ्याचे देहदान करण्याचे हे योगदान मोलाचे असल्याच्या प्रतिक्रिया अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी व्यक्त केल्या.
माणुसकी अन् लाखमोलाची श्रीमंती
- फॅब्रिकेशनचे काम करणाºया मोबीन शेख आणि घरकाम करणाºया रजिया शेख या जोडप्याने पोटचा गोळा देहदान करून आपल्या माणुसकीचे दर्शन घडवत पैशापेक्षाही लाखमोलाची श्रीमंती दाखवली आहे. अल्पशिक्षित असूनही त्यांनी दाखवलेला हा औदार्यपणा समाजापुढे आदर्श ठरला असल्याच्या भावना वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी व्यक्त केल्या.
संशोधन अन् अभ्यासासाठी उपयुक्त: गांधी
- ज्या सयामी (जुळे) बाळाचा शासकीय रुग्णालयामध्ये जन्म झाला, त्या मातेची सोनोग्राफी तपासणी आपल्याकडे झालेली होती. दुर्दैवाने ते जगू शकले नाही. पण त्या बाळाच्या आई-वडिलांनी त्याचे देहादान करून दाखवलेला मोठेपणा निश्चितच मोलाचा आहे. नव्याने वैद्यकीय शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना तो अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल, अशी अपेक्षा प्रख्यात स्त्रीरोय व प्रसतुशास्त्र तज्ज्ञ डॉ. अजित गांधी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.