दोन दिवसांपासून बंटीच्या बंद घरातून दुर्गंधी; मात्र आजूबाजूची मंडळी नाक-तोंड दाबून गप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:30 PM2019-06-13T12:30:50+5:302019-06-13T12:33:49+5:30
अॅड. राजेश कांबळे खूनप्रकरण; शहर पोलीस दलाकडून तपास सुरू
सोलापूर : अॅड. राजेश कांबळे पाच दिवसापासून बेपत्ता होते. तालुका पोलीस ठाण्याच्या पाठीमागील पांडुरंग वस्तीतील एका घरात दोन दिवसांपासून दुर्गंध येत होती. मात्र आजूबाजूच्या लोकंनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. संशयावरून पोलिसांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली असता घरातून अॅड. कांबळे यांचा मृतदेह सापडला.
अॅड. राजेश कांबळे यांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर कांबळे कुटुंबीय शासकीय रुग्णालयात जमा झाले. अॅड. कांबळे यांचे मोठे बंधू मुकेश कांबळे हे रेल्वेमध्ये वर्ग १ चे अधिकारी आहेत. दोन नंबरचे बंधू मिलिंद हे धुळे येथील अलहाबाद बँकेत सहायक व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. तीन नंबरचे बंधू बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये कॅशियर पदावर कार्यरत आहेत तर चौथे राजेश कांबळे यांनी वकिली हा व्यवसाय निवडला होता. ब्रह्मचैतन्यनगर येथे राजगृह हे त्यांचे निवासस्थान असून, शिक्षित कुटुंबीय म्हणून कांबळे परिवाराची ओळख आहे. राजेश कांबळे यांचे शिक्षण बी.कॉम., एलएल.बी़ झाले असून, सरळ साधा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. २0११ साली त्यांचा अस्मिता यांच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना एक मुलगी व एक मुलगा झाला आहे. मुलगी आरोही (परी) चार वर्षांची असून ती एल.के.जी. या वर्गात शिकत आहे, तर मुलगा अवघ्या आठ महिन्यांचा आहे. त्याचे अद्याप नामकरण झाले नाही.
शनिवारी कोर्टाला सुट्टी होती, मात्र तरीही क्लाइंटला भेटायला जायचे आहे म्हणून अॅड. राजेश कांबळे घराबाहेर पडले. आल्यावर जेवण करू असे सांगून परीला बाय केले. तीच भेट शेवटची ठरली.
कांबळे यांच्या खुनाची माहिती ही माहिती समजताच सहायक पोलीस आयुक्त महावीर सकळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट, पोलीस निरीक्षक ईश्वर कोकरे आदींनी तत्काळ पांडुरंग वस्ती येथे धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. राजेश यांच्या अंगावरील दिड लाख रूपये किंमतीचे दागीने, मोबाईल व मोटारसायकल मिळुन आले नाही. बंटी खरटमल हा गायब झाला आहे.
मृत्यूची वार्ता ऐकताच राजेशची पत्नी जमिनीवर कोसळली..
- बंटी खरटमल याच्या घरात पोत्यामध्ये आढळलेल्या मृतदेहाचे तुकडे भरण्यात आले होते. मृतदेह कुजल्यामुळे तो कोणाचा आहे हे लवकर समजून येत नव्हते. भाऊ मिलिंद हे घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी घरातील देवघरात जाऊन पाहणी केली असता दोन काळ्या रंगाच्या पोत्यात राजेश कांबळे यांच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले. मिलिंद यांनी भावाचा मृतदेह ओळखला, पत्नी अस्मिता यांना शासकीय रूग्णालयात बोलावण्यात आले. पत्नीला काही कळेना, काय झाले आहे? असे विचारत त्या रूग्णालयात आल्या. राजेश कांबळे यांचा मृत्यू झाल्याचे सांगताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली, त्या जागेवरच खाली पडल्या. राजेश यांच्या आईने टाहो फोडला, असं कसं झालं असा प्रश्न करीत त्या ओरडू लागल्या. नातेवाईकांनी धीर देण्याचा प्रयत्न केला मात्र त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. शवविच्छेदनानंतर शेवटी साश्रूनयनांनी अॅड. राजेश कांबळे यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. ही बाब अद्याप परीला माहिती नाही. तिला दरम्यानच्या काळात दुसरीकडे पाठवण्यात आलं होतं. परी अद्याप आपल्या पप्पाची वाटच पाहत असून, ते घरी कधी येतात अशी विचारणा आईला करीत आहे...
अॅड. राजेश कांबळे हे बेपत्ता झाल्याने त्यांचा घातपात झाला असावा, याचा तपास एसीपीमार्फत करण्यात यावा, अशी मागणी मंगळवारी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती. पोलिसांनी योग्य तपास करून परिस्थितीजन्य पुरावे गोळा करावेत. या घटनेमुळे वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुरूवारी सकाळी बार असोसिएशनच्या हॉलमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
- अॅड. संतोष न्हावकर
अध्यक्ष, सोलापूर बार असोसिएशन.
झेरॉक्स दुकान चालकाकडून मिळाली माहिती...
- दि. ८ ते ११ जूनदरम्यान अॅड. राजेश कांबळे यांचा काहीच पत्ता लागत नव्हता. मोठे भाऊ व सर्व नातेवाईकांनी शोध सुरू केला. भावाने चौकशी केल्यानंतर अॅड. राजेश कांबळे यांना गुलबर्गा येथील एक मोठी केस मिळणार होती. ही केस एका मोठ्या खासगी रूग्णालयातील सिक्युरिटी गार्ड घेऊन आल्याची माहिती न्यायालयाच्या आवरातील झेरॉक्स मशीन चालकाने दिली. माहितीवरून अॅड. राजेश कांबळे यांचे भाऊ मंगळवारी तालुका पोलीस ठाण्याच्या पाठीमागील पांडुरंग वस्ती येथील बंटी खरटमल याच्या घरी गेले. घर बाहेरून बंद होते़ त्यामुळे ते परत फिरले. संशय आल्याने ही माहिती त्यांनी पोलिसांना दिली. बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दोन पोलीस व भाऊ पांडुरंग वस्ती येथील बंटी खरटमल याच्या घरी गेले. घरातून दुर्गंधी येत होती़ पोलिसांनी आतमध्ये जाऊन पाहणी केली तेव्हा पोत्यामध्ये मृतदेह असल्याचे लक्षात आले.