सोलापुरातही बागेश्वरबाबांचा दरबार; जानेवारीत करणार मैदानांची पाहाणी
By शीतलकुमार कांबळे | Published: November 10, 2023 12:50 PM2023-11-10T12:50:22+5:302023-11-10T12:50:59+5:30
विमान नसल्याने हेलिकॉप्टरची तयारी : ‘एसव्हीसीएस’चे मैदान, होम मैदान, कुंभारी येथील जागा चर्चेत
शीतलकुमार कांबळे
सोलापूर :बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री हे मार्च किंवा एप्रिलमध्ये सोलापुरात येणार आहेत. त्यापूर्वी ८ ते ११ जानेवारी असे तीन दिवस बागेश्वर धामचे पथक सोलापुरात मुक्काम करणार आहे. यादरम्यान ते तीन जागांची पाहणी करतील.
छत्रपती संभाजीनगर येथे धीरेंद्र शास्त्री यांचा दरबार भरला होता. या दरबारामध्ये सोलापुरातून अक्षय अंजिखाने, संजय साळुंखे यांच्यासह पंडित वेणुगोपाल जिल्ला पंतलु हे गेले होते. त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतली. या भेटीमध्ये अखिल भारतीय हिंदू बहुभाषिक पुरोहित संघम यांच्या माध्यमातून धीरेंद्र शास्त्री यांना सोलापुरात येण्याचे निमंत्रण दिले. यावर आपण सोलापुरात येण्यास इच्छुक असल्याचे धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितले.
धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारावेळी अनेक लोकांची उपस्थिती असते. यासाठी मोठे मैदान आवश्यक असते, म्हणून बागेश्वर धाम येथील पथक ८ ते ११ जानेवारी रोजी सोलापुरात मुक्कामी असणार आहेत. यादरम्यान ते एस. व्ही. सी. एस. शाळेचे मैदान, होम मैदान व कुंभारी येथील लक्ष्मीनारायण मंदिराच्या परिसरातील जागा पाहणार आहेत. ही जागा पाहून मार्च किंवा एप्रिल महिन्यातील एक तारीख ठरवून ते सोलापुरात येतील.
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांना सोलापुरात आणण्याबाबत त्यांचे सहायक नितीश शास्त्री यांच्याबाबत बोलणे झाले आहे.
नितीश शास्त्री यांचे पथक सोलापुरातील जागा पाहण्यासाठी येणार आहेत. धीरेंद्र शास्त्री यांना सोलापुरात आणण्यासाठी विमान उपलब्ध नसल्याने हेलिकॉप्टरने येथे येण्याचा त्यांचा मानस आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे.