सोलापूरात पालकमंत्र्याच्या विरोधात बहुजन समाज पार्टीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:06 PM2018-05-22T13:06:04+5:302018-05-22T13:06:04+5:30
सोलापूर : लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत निधी थांबविल्याबद्दल पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात बहुजन समाज पार्टी आक्रमक झाली आहे़ याचा निषेध नोंदविण्यासाठी बहुजन समाज पार्टीच्यावतीने मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले़ यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते़
निधीबाबत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी १ जून २०१७ रोजी बैठक घेतली होती. शासन निर्णयानुसार किमान ३ महिन्यांत १ बैठक घेणे कायद्याने बंधनकारक आहे. वर्ष झाले तरी एकही बैठक न घेतल्याने त्यांचे हे दलितविरोधी धोरण आहे. या धोरणाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत असल्याचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सांगितले़
यानंतरही कोणत्याच उपाययोजना अथवा ठोस पाऊले उचलण्यात न आल्यास टप्प्याटप्प्याने या आंदोलनाची दिशा बदलण्यात येणार असल्याचेही चंदनशिवे यांनी सांगितले़ यावेळी नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेविका ज्योती बमगोंडे, नगरसेविका स्वाती आवळे यांच्यासह अन्य बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते, सदस्य व दलित वस्तीमधील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.