मुस्ती येथील वाळूचोरीच्या आरोपींना जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:20 AM2021-04-06T04:20:50+5:302021-04-06T04:20:50+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून मुस्ती येथील हरणा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी होत्या. वळसंग पोलिसांनी वाळूचोरांना पायबंद ...
गेल्या अनेक दिवसांपासून मुस्ती येथील हरणा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी होत्या. वळसंग पोलिसांनी वाळूचोरांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. परंतु वाळूतस्कर हातावर तुरी देऊन पोबारा करीत होते. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री सापळा रचून वाळू वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले. येथून नदीपात्रात मजुराकरवी वाळूचा उपसा करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे सहायक फौजदार इसाक मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कारवाईत चार ट्रॅक्टर, ट्रॉलीसह ३३ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाळूचोरी करणाऱ्या नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील सहा जणांना ताब्यात घेऊन पोलीस कस्टडी देण्यात आली. रविवारी न्यायालयात हजर केले असता महेश मोरडे, अनिल मोरडे, समाधान मोरडे, अरुण चव्हाण, बाबुराव पडोळकर आणि रामदास राठोड यांना अक्कलकोट न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अन्य तीन आरोपी फरार असल्याने त्यांचा शोध सुरू आहे.