बाळांतिणीचा मृतदेह रुग्णालयासमोर ठेवून नातेवाइकांनी मारला ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:18 AM2020-12-26T04:18:33+5:302020-12-26T04:18:33+5:30
सांगोला : हातीद येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या बाळांतिणीचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत ...
सांगोला : हातीद येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या बाळांतिणीचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत तिच्या नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. तसेच संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत रुग्णालयासमोरच तिचा मृतदेह ठेवून ठिय्या मारला.
सुरेखा सुधीर भगत (वय २१) असे मरण पावलेल्या बाळांतिणीचे नाव आहे. दरम्यान, सांगोला पोलिसांनी या रुग्णालयाकडे धाव घेत हस्तक्षेप केला आणि चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देताच नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
हातीद (ता. सांगोला) येथील सुधीर पांडुरंग भगत यांची पत्नी सुरेखा भगत गरोदर असल्याने त्यांना वेदना होऊ लागल्या. सासरे पांडुरंग भगत, वडील महादेव भोसले, आई वंदना भोसले यांनी २३ डिसेंबर रोजी प्रसूतीसाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. असह्य वेदना होऊ लागल्याने नातेवाइकांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली. येथील तज्ज्ञांनी डॉक्टर मी आहे का ? तुम्ही असा प्रश्न करीत शांत राहण्याचे आवाहन केले.
बाळांतिणीची प्रकृती खालावत चालल्याने संबंधित डाॅक्टरांच्या बाळांतिणीला तत्काळ उपचाराकरिता खासगी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. सांगोल्यात खासगी रुग्णालयात उपचारानंतर तिची प्रकृती गंभीर झाली. तिला पुढील उपचाराकरिता सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्त्राव होऊन गुरुवारी रात्री ९च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तिच्या नातेवाइकांनी सोलापुरातून थेट तिचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी ७च्या सुमारास सांगोला येथील ग्रामीण रुग्णालय समोर आणून ठेवून ठिय्या मारला. संबंधित डाॅक्टरसह महिला कर्मचारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सासरे पांडूरंग भगत यांनी केली.
डॉक्टरांकडून चुकीचे उपचार झाल्याने बाळांतिणीचा अति रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयाच्या डाॅक्टरांसह संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
---
अन् पोलिसांनी हस्तक्षेप केला
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अभिजित सावर्डे-पाटील, पोलीस निरीक्षक राजेश गवळी सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगार यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. नातेवाइकांकडून घडल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. मात्र नातेवाईक काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. गुन्हा दाखल न झाल्यास या ठिकाणीच मृतदेहावर अंत्यविधी करू म्हणत टाहो फोडून गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
---
प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
- राजेश गवळी
पोलीस निरीक्षक
सांगोला पोलीस ठाणे
---
फोटो -
प्रसूतीनंतर मरण पावलेल्या बाळांतिणीच्या नातेवाइकांनी सांगोला ग्रामीण रुग्णालयासमोर मृतदेह ठेवून डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या मारला.