बाळासाहेब शेळके यांची फेरनिवड
By admin | Published: June 22, 2014 12:17 AM2014-06-22T00:17:40+5:302014-06-22T00:17:40+5:30
जिल्हाध्यक्षपदाच्या चर्चेला पूर्णविराम
सोलापूर : लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सोडलेल्या बाळासाहेब शेळके यांची फेरनिवड झाली.
सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवानंतर शेळके यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष आणि शिंदे यांच्याकडे पाठवला होता़ मुंबईच्या चिंतन बैठकीत राजीनामा नामंजूर के ल्याचे सांगण्यात आले़ त्यानंतर दि़ ३ जून रोजी शेळके आणि धर्मा भोसले या दोघांनीही पदाचे राजीनामे दिले़ ते मंजूर करण्यात आले़ शहराध्यक्षपदी प्रकाश यलगुलवार यांची नियुक्ती करण्यात आली़ मात्र, जिल्हाध्यक्षपद रिक्तच राहिले़ सुशीलकुमार शिंदे यांनी आज शेळके यांची फेरनिवड केली.
आनंदराव देवकते यांच्याकडून शेळके यांनी जिल्हाध्यक्षपदाचा पदभार घेतला होता़ त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसने लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत चांगली कामगिरी केली़ मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाने त्यांच्या कारकिर्दीला गालबोट लागले़ आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक फेरबदल करण्याच्या हेतूने त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला़
--------------------------
गळती रोखण्याचे आव्हान
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षात अस्वस्थता पसरली आहे़ राजेंद्र राऊत, शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला़ उर्वरित नेतेही महायुतीच्या वळचणीला जाण्याच्या तयारीत आहेत़ पक्षात संभ्रमाचे वातावरण असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत ही पडझड चालूच राहणार आहे़ पक्षातील गळती रोखण्याचे मोठे आव्हान बाळासाहेब शेळके यांना पेलावे लागणार आहे़