बालिकेची हैदराबादमध्ये विक्री फिसकटली; मुंबईला जाताना दोघी जाळ्यात अडकल्या !
By Appasaheb.patil | Published: November 3, 2022 04:39 PM2022-11-03T16:39:46+5:302022-11-03T16:40:10+5:30
बाळ सुखरुप : आरपीएफमधील मायमाऊलीने केला तिचा सांभाळ
सोलापूर : दोन महिलांनी मुंबईहून एका वर्षाच्या बालिकेला विक्रीसाठी हैदराबादला नेले. मात्र, बोलणी फिसकटल्याने पुन्हा त्या बालिकेला मुंबईला घेऊन जात असताना सोलापुरातील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी त्यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी पहाटेच्या सुमारास हुसेनसागर एक्स्प्रेसमध्ये केली. याप्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेऊन मुंबई रेल्वेपोलिसांच्या स्वाधीन केले.
याबाबत रेल्वे पेालिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबई येथील मुस्कान अदनान शेख (वय २४) या महिलेची एक वर्ष एक महिन्याची मुलगी फातिमा शेख हिचे अपहरण करण्यात आल्याची फिर्याद मुंबई पोलिसात दिली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी मुलीच्या तपासासाठी विविध ठिकाणी पथके रवाना केली होती. १ नोव्हेंबर २०२२ रोजी साडेसहा वाजता मुंबईच्या टीमने सोलापूरच्या रेल्वे पोलिसांना दोन महिला एका बाळाला हैदराबादहून मुंबईकडे हुसेनसागर एक्स्प्रेसने येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सोलापूरच्या पेालिसांनी रात्री साडेदहा वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॅार्म क्रमांक ४वर गाडीची तपासणी केली. दरम्यान, संबंधित त्या दोन महिलांना बाळासह ताब्यात घेतले. याबाबत दोन्ही महिलांवर मुंबई येथील वांद्रे रेल्वे पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--------
दोन महिला... दोन मोबाईल जप्त अन् एक मुलगी
याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी सुदेतादेवी उपेंदर पासवान (वय ४२), शरीफा सलीम शेख (वय ५०) व हिना सलीम शेख (वय १२) या तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर त्या महिलांकडून महत्त्वाची कागदपत्रही ताब्यात घेतली आहेत. पुढील कारवाईसाठी सोलापूरच्या रेल्वे पोलिसांनी मुंबई रेल्वे पोलिसांकडे स्वाधीन केले.
---------------
...यांनी केली कारवाई यशस्वी
सोलापूर येथील रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक सतीष विधाते, ड्युटी प्रभारी अनुज पटेल, एएसआय श्यामसिंह, प्रभारी अधिकारी नागनाथ मामुरे, महिला अधिकारी उर्वशी मनोज यादव, शम्भू कुमार, अनिल गवळी, अनिल धोटे यांनी कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली.
-----------
१२ तास महिला पोलिसांनी सांभाळले त्या बाळाला
अपहरण करणाऱ्या महिलांकडून बाळाला ताब्यात घेतल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला पोलीस अधिकारी उर्वशी मनोज यादव, शम्भू कुमार या दोन महिलांनी त्या एक वर्षाच्या बाळाला १२ तास सांभाळले. महिला पोलिसांनी त्या बाळासाठी रात्र पोलिस ठाण्यातच काढली. बाळासाठी लागणारे बिस्कीटस, दूध, पाण्याची व्यवस्थाही त्या महिला पोलिसांनी केली होती. सकाळपर्यंत त्याची योग्य ती काळजी घेतली अन् आनंदाने बुधवारी सकाळी मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले.
---------
२० डब्याची रेल्वे अन् १० पोलिसांची शोध मोहिम
त्या महिलेचा फोटो मुंबई पोलिसांनी सोलापूरच्या पोलिसांना पाठविला. त्यानुसार हुसेनसागर एक्सप्रेस सोलापुरात आल्यानंतर किमान अर्धा तास सर्व डब्यात पोलिसांनी शोध घेतला. अखेर जनरल डब्यात ती महिला संशयितरित्या बसलेली आढळली. त्या महिलेला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणून बसविले होते.