बळीराजा.. योजनांचा लाभ घ्यायचाय ‘महाडीबीटी’वर ऑनलाइन करा अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:15 AM2021-06-19T04:15:54+5:302021-06-19T04:15:54+5:30
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनेअंतर्गत विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ...
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनेअंतर्गत विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी तालुका, उपविभाग व जिल्हास्तरावरील कृषी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना सतत ये-जा करावी लागत होती. या ऑनलाइन अर्जासाठी नाममात्र फी आकारण्यात येते. त्यामुळे शेतकरी स्वतः घर बसल्या कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी अर्ज करू शकतात. यानंतर कृषी विभागामार्फत ऑनलाइन पद्धतीने सोडत काढली जाते. निवड झाल्यानंतर त्यांना लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येते.
निवड झालेल्या घटकासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पुढील कागदपत्रांची छाननी, पूर्वसंमती देणे, मोका तपासणी करणे व अंतिमतः अनुदानासाठी शिफारस करणे या सर्वप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना जलदगतीने व पारदर्शकपणे विविध योजनांचा लाभ देणे शक्य होत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
----
१३ लाभार्थ्यांची निवड
सन २०२०-२१ मध्ये बार्शी तालुक्यातील प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना-सूक्ष्म सिंचन या योजनेअंतर्गत ठिबक सिंचन व तुषार सिंचन या घटकासाठी एकूण ४०२४ लाभार्थीं, कृषी यांत्रिकीकरण या घटकांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, फलोत्पादन यांत्रिकीकरण आदी योजनांमध्ये ट्रॅक्टर, पावर टिलर, रोटावेटर, मळणी यंत्र, पेरणी यंत्र, फवारणी यंत्र आदी बाबींसाठी एकूण १०९ लाभार्थी व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत संरक्षित शेती, कांदा चाळ या घटकासाठी एकूण १३ लाभार्थ्यांची निवड झाली आहे. पुढील प्रक्रिया प्रगतिपथावर असल्याची माहिती कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे यांनी दिली.
-----
मालवंडीच्या शेतकऱ्याला पहिला मान
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान-फलोत्पादन यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर या घटकाचा महाडीबीटी पोर्टलद्वारे राज्यातील पहिला अनुदानाचा लाभ बार्शी तालुक्यातील मालवंडी येथील शेतकऱ्यांला मिळाला असल्याचे असल्याचे तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांनी सांगितले.