बळीराजाला खरिपाची आशा पल्लवित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:17 AM2021-06-04T04:17:59+5:302021-06-04T04:17:59+5:30
माळशिरस तालुक्यात रोहिणी नक्षत्रात वेळेवर पावसाने श्रीगणेशा केला. याशिवाय मृग नक्षत्रातील पाऊस बाकी आहे. उन्हामुळे जमिनी तापलेल्या आहेत. अनेक ...
माळशिरस तालुक्यात रोहिणी नक्षत्रात वेळेवर पावसाने श्रीगणेशा केला. याशिवाय मृग नक्षत्रातील पाऊस बाकी आहे. उन्हामुळे जमिनी तापलेल्या आहेत. अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या जमिनींना जोरदार पावसाची गरज आहे. मात्र पावसाला सुरुवात झाल्याने शिवारात मातीचा गंध पसरला व ग्रामीण भागात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळा सुरू होऊनही सध्या तरी खरिपासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
दुष्काळी पट्ट्यात चैतन्य
पहिला पाऊस पडला की, मातीचा गंध आपल्याला धुंद करून जातो, सुखावून जातो. कुठल्याही अत्तराच्या कुपीत नसलेला हा सुगंध जमिनीतील स्ट्रॅप्टोमायसीस (स्पोअर्स) हा जीवाणू उष्ण हवामानात न वाढता कठीण कवचधारी पेशीच्या स्वरूपात जमिनीत राहतात. पहिल्या पावसामुळे स्पोअर्स हवेत विखुरतात. यात जिओस्मीन नावाचे जैवरसायन असते, त्याचा वास आपणास येतो. तोच मातीचा सुगंधी गंध म्हणून ओळखला जातो. बॅक्टेरिया स्पोअर्समुळे निर्माण झालेला वास हा मनाला प्रसन्नता देणारा असतो. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातही चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंडलनिहाय पाऊस
माळशिरस १५ मि.मी., सदाशिवनगर १५ मि.मी., इस्लामपूर १५ मि.मी., नातेपुते २० मि.मी., दहिगाव ३८ मि.मी., पिलीव १८ मि.मी., वेळापूर १४ मि.मी., महाळूग १२ मि.मी., अकलूज १२ मि.मी., लवंग १४ मि.मी. अशा एकूण १७३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.