बाळे मालधक्का सुनासुना !
By Admin | Published: June 11, 2014 12:45 AM2014-06-11T00:45:18+5:302014-06-11T00:45:18+5:30
हुंडेकऱ्यांचा संप : सहा कोटींची उलाढाल ठप्प
सोलापूर : वेळेत सिमेंट, धान्य उतरवून न घेतल्यास रेल्वे प्रशासनाकडून आकारण्यात येणाऱ्या सहापट दंडाच्या रकमेचा निर्णय मागे घ्यावा, या प्रमुख मागणीसाठी सोलापूर हुंडेकरी असोसिएशनने बेमुदत बंद पुकारला असून, जम्बो सायडिंग आणि रेल्वे मालधक्का ओस पडला आहे. सहा दिवसांमध्ये सुमारे सहा ते साडेसहा कोटी रूपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. रेल्वे प्रशासन आणि हुंडेकऱ्यांच्या वादात माथाडी कामगार, ट्रकचालक, क्लिनरवर उपासमारीची वेळ आली आहे.
सोलापूर रेल्वे स्थानकाच्या मागे असलेल्या जम्बो सायडिंगवर ५५ हजार पोत्यांचे लोडिंग होते. तेवढ्याच पोती बाळे मालधक्क्यावर येत असतात. सिमेंट घेऊन एखादी गाडी आल्यास ती रिकामी करून घेण्यासाठी हुंडेकऱ्यांना ९ तासांची मुदत असते. कधी-कधी काही मालगाड्या सायंकाळी दाखल होत असतात. माथाडी कायद्याप्रमाणे सायंकाळी ६ वाजता मालधक्क्यावरील कामकाज बंद होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लोडिंग करून घ्यावी लागते. ९ तासांची मुदत संपून जाते. दुसऱ्या दिवशी तासाप्रमाणे वारपेज, डॅम्ब्रेजच्या नावाखाली सहापट दंड आकारला जातो. याबाबत सोलापूर हुंडेकरी असोसिएशनने सातत्याने रेल्वे प्रशासनाला पत्र देऊनही हुंडेकऱ्यांचा हा प्रमुख प्रश्न मिटला नाही. सहापट दंडात्मक कारवाईची अट मागे घेण्यासाठी राज्यातील ६१ मालधक्के बंद आहेत. दरम्यान, उद्या (शनिवारी) पुण्यात राज्य हुंडेकरी असोसिएशनची बैठक होत असून, या बैठकीत हा प्रश्न चर्चिला जाणार आहे. सोलापूर हुंडेकरी असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश मुनाळे, सचिव बाबुराव घुगे उपस्थित राहणार आहेत.
--------------------------------
७०० कामगार संकटात
जम्बो सायडिंग आणि नव्याने सुरु करण्यात आलेल्या बाळे मालधक्क्यावर सुमारे ७०० ते ७५० माथाडी कामगार आहेत. दररोज काम केल्याशिवाय या कामगारांना गत्यंतर नसते. दोन्ही मालधक्के बंद असल्यामुळे माथाडी कामगारांना बसून रहावे लागत आहे. माथाडी कामगारांशिवाय ट्रकचालक, क्लिनर यांच्याही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
------------------------------
रेल्वे मंत्रालयाचा मनमानी कारभार सुरू आहे. एकीकडे सोलापूर भकास होत असताना दुसरीकडे हुंडेकरी व्यवसायाला खीळ घालण्याचा प्रकार होत आहे. माथाडी कामगारांसह अनेकांना रोजगार देणाऱ्या या व्यवसायातील हुंडेकऱ्यांना दिलासा मिळण्याची गरज आहे.
- बाबुराव घुगे
सचिव- सोलापूर हुंडेकरी