बाळूमामाचं चांगभलं... म्हणत अट्टल गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या
By दिपक दुपारगुडे | Published: August 9, 2023 06:28 PM2023-08-09T18:28:14+5:302023-08-09T18:28:32+5:30
आरोपी रुईया ऊर्फ सूरज जाधव याला बाळूमामाचं चांगभलं म्हणत घेराव घालत ठोंबरेवाडी, लक्ष्मीनगर (ता. सांगोला) येथून ताब्यात घेतले.
सोलापूर : भक्तिमय वातावरणात बाळूमामाच्या मेंढरांच्या तळावर रंगलेल्या कीर्तन सोहळ्यात धोतर, घोंगडी, कपाळी भंडारा लावलेल्या पोलिसांनी सापळा रचून ७ ठिकाणच्या पोलिसांना वेगवेगळ्या गुन्ह्यांत गेल्या अनेक दिवसांपासून हवा असलेला आरोपी रुईया ऊर्फ सूरज जाधव याला बाळूमामाचं चांगभलं म्हणत घेराव घालत ठोंबरेवाडी, लक्ष्मीनगर (ता. सांगोला) येथून ताब्यात घेतले.
दारू पिण्यासाठी पैसे दे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करत हाताने लाथाबुक्क्याने मारहाण केली व कोयत्याने चेहऱ्यावर, दोन्ही हातांवर व दोन्ही पायांच्या गुडघ्याच्या खाली नडगीवर वार करून गंभीर जखमी केल्याची फिर्याद रुईया ऊर्फ सूरज जाधव (रा. जाधववाडी, ता. माळशिरस) व अजय आढाव (रा. मेडद, ता. माळशिरस) यांच्या विरुद्ध माळशिरस पोलिसांत होती.
सहा ठिकाणच्या गुन्ह्यातील आरोपी जाळ्यात
माळशिरस नातेपुते ३ गुन्हे, सांगोला २ गुन्हे, (जि. सोलापूर) लोणंद १, म्हसवड १, फलटण १ (जि.सातारा) यवत १ (जि.पुणे) असा एकूण ९ पोलिसांना हवा असल्यामुळे पोलिस या आरोपींच्या शोधात होते. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सई भोरे-पाटील, पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नितीन घोळकर, पोलिस उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते, एम.एम पुजारी, पोलिस अंमलदार संतोष घोगरे, दत्ता खरात, मारुती शिंदे, अमित जाधव, धीरज काकडे आदींच्या पथकाने केली.