बेकायदेशीर जमाव अन् सभा, बैठका घेण्यास बुधवारपर्यंत बंदी
By दिपक दुपारगुडे | Published: May 6, 2024 09:21 PM2024-05-06T21:21:37+5:302024-05-06T21:21:47+5:30
सार्वजनिक सभा व बैठका घेण्यास पोलीस आयुक्तांनी कलम १४४ चा आदेश जारी करुन बंदी घातली आहे.
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मंगळवारी सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी मतदान होत आहे. ही प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी ८ मे रोजी सायंकाळी ६ पर्यंत बेकायदेशीर जमाव जमवणे तसेच सार्वजनिक सभा व बैठका घेण्यास पोलीस आयुक्तांनी कलम १४४ चा आदेश जारी करुन बंदी घातली आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने यापूर्वीच १६ मार्च २०२४ पासून आचारसंहिता लागू केली आहे. जाहीर कार्यक्रमानुसार ७ मे रोजी मतदान होत आहे. ही प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याच्या दोन दिवस अगोदार आणि त्यानंतरचा एक दिवस जमाव जमवणे, सभा बैठका घेण्यास बंदी घालणे जरुरीचे असल्याचे आदेशात म्हटले आहे. हा आदेश फौजदारी प्रक्रिया १९७३ चे कलम १४४ अन्वये लागू करण्यात आले आहे. हा आदेश मतदानासाठी घरोघरी जाऊन भेटी देण्यासाठी लागू होणार नाही. या आदेशाचा भंग केल्यास संबंधीत व्यक्ती कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशामध्ये म्हटले आहे.