बोरी नदीवरील बणजगोळ बंधा-याला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:41 AM2021-02-21T04:41:57+5:302021-02-21T04:41:57+5:30
अक्कलकोट : कुरनूर धरणातून रब्बी व पिण्यासाठी नुकतेच पाणी सोडण्यात आले. अधिका-यांच्या दुर्लक्षपणामुळे बणजगोळसह विविध बंधा-याच्या दुरूस्तीचे ...
अक्कलकोट : कुरनूर धरणातून रब्बी व पिण्यासाठी नुकतेच पाणी सोडण्यात आले. अधिका-यांच्या दुर्लक्षपणामुळे बणजगोळसह विविध बंधा-याच्या दुरूस्तीचे काम अपूर्ण राहिले आहेत. मागील तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. ही गळती अशीच सुरू राहिल्यास बंधा-यातील पाणीसाठा लवकरच संपून जाईल अशी भीती शेतकरी व ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
कुरनूर धरणातून मंगळवारी सकाळी ११.३० च्या दरम्यान रब्बी पिकांसाठी व पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनीसह नदीकाठच्या गावचा आणि शेतीचा पाणी प्रश्न मिटला. परंतू बोरी नदीकाठावरील बणजगोळ, सांगवी, संगोगी, सातन दुधनी येथील बहुतांश बंधा-यांची किरकोळ दुरुस्ती करूनच पाणी सोडण्याचा निर्णय बैठकीत झाला होता. संबंधित अधिका-यांनी ही दुरुस्ती न करताच पाणी सोडले.
या सोडलेल्या पाण्यातून अक्कलकोट,सांगवी,ममदाबाद, बणजगोळ, निमगाव,सातनदुधनी,
रुददेवाडी,बबलाद,सिंदखेड येथील आठ बंधारे भरून घेतले आहेत. या मुळे तीन नगरपालिकेचा पाणी पुरवठा योजनेसह नदीकाठावर अवलंबून असलेल्या गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. परंतू पूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश बंधा-यांचे नुकसान झाले. परिणामी प्लेट लिकेज् होऊन पाणी गळती होत आहे. याबाबत ग्रामस्थ गडेप्पा व्हसुरे, गंगाराम राघोजी, सुरेश तळवार,बाळू घाटगे, मल्लिनाथ राघोजी, शिवाजी धडके, गुडुसाब पठाण, महमद पठाण, शिवानंद राघोजी, रमेश मुळे या ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
---
आमदारांच्या सूचनांकडे दुर्लक्ष
चार दिवसापूर्वी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत अक्कलकोटमध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती. या बैठकीत बोरी नदीवरील बंधारे किरकोळ दुरुस्त करून पाणी सोडण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या. तसे न करता धरणाचे चार दरवाजे प्रत्येकी एक ते दीड इंच उचलून त्यातून ६०० क्युसेक्स पाणी खाली सोडले.
---
कुरनूर धरणाखालील बोरी नदीकाठावरील बणजगोळसह इतर बंधारे दुरुस्ती संदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. तो मंजूर झाल्यास बंधा-यांची दुरुस्ती त्वरीत करण्यात येईल. तसेच बंदी असताना जडवाहनांची वाहतूक सुरु आहे. ती बंद करावी. अन्यथा कारवाई करावी लागेल.
-
प्रकाश बाबा
उपविभागीय अधिकारी, बोरी मध्यम प्रकल्प
---
बंधा-यातून होणारी पाण्याची गळती थांबवावी. संरक्षण भिंत बांधून देण्यात यावे. कालवा समिती बैठकीत आमदारांनी सुचविलेल्या प्रश्नांकडे अधिका-यांनी दुर्लक्ष केले आहे.
- गडेप्पा व्हसुरे
- शेतकरी, बणजगोळ.
--
फोटो : २० बनजगोळ
बोरी नदीकाठावर बनजगोळ बंधा-याची संरक्षक भिंत सुरक्षीत नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु आहे.