खराब रस्त्यावर केले वृक्षारोपण
By Admin | Published: June 11, 2014 12:40 AM2014-06-11T00:40:40+5:302014-06-11T00:40:40+5:30
काँग्रेस नगरसेवकांनी वेधले पालिकेचे लक्ष
बार्शी : गेल्या अनेक वर्षांपासून एखाद्या खेड्यातील रस्त्यापेक्षा वाईट अवस्था झालेल्या उपळाई ते परांडा रोडला जोडणाऱ्या फुले मंगल कार्यालयासमोरील रोडवरील खड्ड्यात काँग्रेसच्या नगरसेवकांनी वृक्षारोपण करुन या रस्त्याच्या दुरवस्थेकडे पालिकेचे लक्ष वेधले़ मंगळवारी सकाळी ही घटना घडली.
बार्शी शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या फुले मंगल कार्यालयासमोरील या ५०० मीटर रस्त्याची गेल्या तीन-चार वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. जवळपास दीड ते दोन फुटाचे खड्डे या रस्त्यावर आहेत़ त्यात या रस्त्यावर सतत पाणी येत असल्यामुळे चिखलाचे देखील साम्राज्य असते़ विशेष म्हणजे हा रस्ता बार्शी-परांडा या राज्य रस्त्याला जोडणारा आहे, त्यामुळे पालिकेने इकडे लक्ष द्यायला हवे होते, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक व नगरसेवकांनी वेळोवेळी मागणी करुन देखील हा रस्ता दुरुस्त केला जात नाही़, असे दीपक राऊत यांनी सांगितले.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे व्यावसायिक व नागरिक वैतागले आहेत. त्यामुळेच आज (मंगळवारी) पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे लक्ष वेधण्यासाठीच काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी या रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करुन आंदोलन छेडले.
यावेळी नगरसेवक अशोक बोकेफोडे, दीपक राऊत, महेदीमियाँ लांडगे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष काका फुरडे, किशारे मांजरे, युवराज ढगे, विशाल खलसे, सादिक मुल्ला, कय्युम पटेल, गौतम सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते़
----------------------
हा रस्ता प्रभाग क्र. ६ मधील विरोधी पक्षाच्या नगरसेवकाच्या प्रभागात येत आहे़ विरोधी नगरसेवकाविषयी नागरिकांत नाराजी वाढावी म्हणून जाणीवपूर्वक काम केले जात नाही, काम मंजूर असून वर्कआॅर्डर होऊनही काम होत नाही याचा अर्थ काय?
- अशोक बोकेफोडे
नगरसेवक, काँग्रेस
---------------------------------
रस्त्याची वर्कआॅर्डर झालेली आहे़ आम्ही कामे करीत असताना विरोधक व सत्ताधारी असा भेदभाव कधीच केलेला नाही व पुढेही करणार नाही़ काँग्रेसचे आजचे आंदोलन म्हणजे केवळ राजकीय स्टंट आहे़ शहरातील इतर भागातही टप्प्याटप्प्याने कामे सुरु आहेत़
- नागेश अक्कलकोटे
गटनेता राष्ट्रवादी काँग्रेस