बँक शाखाधिकारी, शिपायाला ग्राहकाची शिवीगाळ, दरवाजाच्या काचा फोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:21 AM2021-04-18T04:21:39+5:302021-04-18T04:21:39+5:30
महूद येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शुक्रवारी स. १० ते ४ या वेळेत ग्राहकांचे बँकेतील दैनंदिन कामकाज संपल्यावर शाखाधिकारी ...
महूद येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शुक्रवारी स. १० ते ४ या वेळेत ग्राहकांचे बँकेतील दैनंदिन कामकाज संपल्यावर शाखाधिकारी शामराव टिळे, अधिकारी संदीप पालीनकर, मुख्य रोखपाल पापा नुला सप्तगिरी व शिपाई मारुती केंगार बँकेचे शटर अर्धवट ओढून अंतर्गत कामकाज करीत होते. दरम्यान दु. ४ वाजून १० मिनिटांच्या सुमारास एका ग्राहकाने बँकेचा मुख्य दरवाजा ठोठावून मला पैसे भरण्यासाठी आत येऊ द्या, असे शिपाई मारुती केंगार यास म्हणाला. त्यांनी बँकेच्या कामकाजाची वेळ आता संपली आहे, तुम्ही उद्या या, असे त्यास सांगितले.
त्यावेळी त्या ग्राहकाने तुम्हा बँकवाल्यांना लय मस्ती आली आहे, असे म्हणून दरवाजा वाजवून गोंधळ घालू लागल्याने शाखाधिकारी शामराव टिळे यांनी शिपाई केंगार यास काय झाले, अशी विचारणा केली. त्या ग्राहकाने शाखाधिकाऱ्यासह शिपायास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत तुम्ही बाहेर या, तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी देऊ लागला. शाखाधिकारी त्याला समजून सांगत असताना त्याने बँकेच्या मुख्य दरवाजावर हाताने जोरजोरात बुक्क्या मारून काचा फोडल्या. हा प्रकार सुरू असताना शाखा अधिकारी शामराव टेळे हे पोलिसांना फोन लावत असताना त्या ग्राहकाने तेथून धूम ठोकली. शाखाधिकारी शामराव शिवाजी टेळे (रा. पंतनगर-पंढरपूर) यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अजित रवींद्र देवळे (रा. महूद, ता. सांगोला) याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५३ अन्वये शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.