बँकेतच पैसं न्हायतं !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 07:10 PM2019-02-16T19:10:46+5:302019-02-16T19:11:05+5:30
गयाबाई. वय वर्षे ७६. मूल-बाळ नाही. तरुणपणातच नवºयानं सोडून दिलेली गयाबाई. माहेरातच बापाघरी आयुष्य काढलेलं. आयुष्यभर कष्ट करून पैसा ...
गयाबाई. वय वर्षे ७६. मूल-बाळ नाही. तरुणपणातच नवºयानं सोडून दिलेली गयाबाई. माहेरातच बापाघरी आयुष्य काढलेलं. आयुष्यभर कष्ट करून पैसा कमावलेला. घाम गाळून पै-पै गठुड्यात साठवलेलं. लेकरू-बाळ नाही म्हटल्यावर, पुतण्यावरच जीव लावला. कुणीतरी वेळेला पडेल म्हणून तिने तो आधार शोधला होता.
पुतण्याही तिचा आधार झाला होता. त्याच्यावर खूप जीव आणि तितकाच विश्वासही. घासातला घास काढून ठेवावा. पैशातला पैसा त्याच्यासाठी द्यावा. गठुड्यात साठलेलं पैसं काय करायचं म्हणून, या पुतण्याच्याच ओळखीनं बँकेत ठेवलेलं. डीसीसी बँकेत निराधारचे सहाशे रुपये, कधी पाचशे रुपये मिळायचे. ते पण साठवून ठेवलेले. हिश्श्याची ज्वारी मिळायची. ती विकायची. त्यातून साठलेले पैसेही असायचे. एकट्या जीवाला लागतंय किती आणि एक माणूस खातो किती?
पुतण्यावर जीव. पुतण्याचा त्याच्या मित्रावर विश्वास. मित्र पतसंस्थेचा संचालक. केली एफडी त्याच्या पतसंस्थेत. महिने गेले. वर्षे गेली. पैशाचे दामदुप्पट व्हायचे. ते पुन्हा फिरवून तिथेच एफडी करायचे. जीव जाळायचा. मोह टाळायचा. मिळालेला कमी-अधिक पैसा त्यात घालून पुन्हा एफडी. त्याला हातच लावायचा नाही.
हात लावायची गरजही नव्हती. बघता बघता ही रक्कम दीड लाख रुपये झाली होती. पतसंस्थेत आपले दीड लाख रुपये आहेत, एवढ्या गोष्टीनं गयाबाईचा जीव सुखावून जायचा. साठवलेला पैसाच उपयोगी येतो. आपल्या आयुष्याची शिदोरी आपण जमा करून ठेवलीय. काय अडचण आली, काही दुखलं-खुपलं तर तेवढाच एक आधार. ऐनवेळेला कोण दारात उभं राहू देतंय. त्या एफडीचं गयाबाईला खूप सुख वाटायचं. खूप आधार वाटायचा. वय वाढत होतं. म्हातारपण वाकडं दाखवत होतं. पण वाकेल ती म्हातारी कसली.
पैशाला अजिबात हात लावायचा नाही. आपलाच हाय त्यो पैसा, असं म्हणायची. एकदा दुपारची दारात आली. दादा, ये दादा. मला जरा गाडीवर बँकेत घेऊन चल की. मी विचार केला, हिला आता गाडीवर बाजारात कशाला जायचंय? म्हातारी चालत कुठंही जाती. आता हिला एवढं काय तातडीचं काम पडलं? म्हणून विचारलं, कशाला जायचंय बाजारात? कायम जाती तशी जा की चालत.
आवाज वाढवूनच म्हटली, आरं, गुडगं गेलं की मातीत. तुला माहीत न्हाय होय. महिनाभर उंबºयाच्या बाहीर पाऊल ठिवायला ईना. तिथल्या तिथं कसंतरी बस-ऊठ करती. मग आता बाजारात कशाला जायचंय? मी विचारलं.
कापºया आवाजात गयावया करतच गयाबाई म्हणाली, आरं, दोन दिवस झालं, परभ्या दवाखान्यात अॅडमिट हाय.
मी म्हणालो, का? काय झालं त्याला? आरं, गाडीला धडकून पडला. कंबरडं मोडलंय. नीट करायचाय. पैसा न्हाई. बँकेत पैसे हायतं. चार दिवस झालं निरोप दितीया बँकेत. कोणच खाईना बघ. आज जावू याच बघ. चल, मला गाडीवर सोडून ई.
मी म्हटलं, आगं, तुझा गुडघा बाद झालाय. तुला नीट उभं राहता येत नाही. त्यात तू गाडीवर बसणार. घसरली, पडली तर काय करायचं. कामात काम वाढणार. तुला गाडीवर नीट बसायला पण यायचं नाही. दुसरी गोष्ट तू अशी दुपारची माझ्या कामाच्या वेळी आलीस. मला काम सोडून जायचं म्हणजे अवघड वाटतंय. असं करतो, रिक्षा सांगतो. त्यात बसून तू बँकेत जा.
आरं रिक्षाला पैसं कुठूनं आणायचं. कोण आणायचं रिक्षा. चल, माज्यासाठी. लय नड हाय. दवाखान्यात पैसं पाठवायचं हायतं. माझा लय जीव हाय रं त्याच्यावर. त्ये लेकरू नीट झालं तर बरं. त्याच्यासाठी नगं का पैसं द्यायला. इलाजासाठी पैसं कमी पडत्यात म्हणत होती त्याची बायको. त्याचा जीव चाललाय. त्याच्यासाठी माझा जीव चाललाय. बँकेत पैसं ठिवून काय काडी लावायची हाय? चल बाबा लवकर!
विचार केला. म्हटलं गाडीवर न्यायचं तर अवघडच आहे. ही म्हातारी नीट बसणार नाही हे नक्की. रिक्षानेच पाठवायला हवं. पाठवायला तर हवंच हवं. विचार केला. गेले साठ-सत्तर रुपये तर काय हरकत आहे.
- इंद्रजित घुले
(लेखक हे कवी आहेत.)