बनशेट्टी म्हणाले ‘पालकमंत्र्यांच्या घरीही जेवल्याचं सांगायला सुरेशअण्णा विसरले !’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:22 AM2018-11-23T10:22:41+5:302018-11-23T10:23:30+5:30

निंबर्गी म्हणाले, आमच्यासोबत पाटलांचीही नार्को टेस्ट करा.. तिघांचा जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात जबाब

Banshetty said, 'Sureshanna forgot to tell her at the home of the Guardian's house!' | बनशेट्टी म्हणाले ‘पालकमंत्र्यांच्या घरीही जेवल्याचं सांगायला सुरेशअण्णा विसरले !’

बनशेट्टी म्हणाले ‘पालकमंत्र्यांच्या घरीही जेवल्याचं सांगायला सुरेशअण्णा विसरले !’

Next
ठळक मुद्देफेसबुकवर बदनामी.. दोघांविरुद्ध गुन्हा महापौरांनी बोलून दाखविला राजीनाम्याचा विचारजीवघेणी स्पर्धा ज्यांच्यासोबत झाली त्यांना कसं विसरला : प्रा. निंबर्गी 

सोलापूर : सुरेश पाटलांनी दिलेल्या फिर्यादीची कॉपी आम्ही पाहिली. त्यात त्या माणसाने छोट्या-छोट्या गोष्टींचा उल्लेख केलाय. अमक्याच्या घरी जेवलो, तिथे तमका उपस्थित होता. दौंडला पावण्याच्या घरी गेलो.  पण त्यांनी मुंबईत पालकमंत्र्यांच्या घरीही जेवण केलं होतं. इतका मोठा उल्लेख ते कसं काय विसरले? मात्र त्याची आठवण मी पोलिसांना करून दिली आणि माझ्या जबाबात याची नोंद करायला लावली, असे श्रीशैल बनशेट्टी यांनी गुरुवारी सांगितले. 

थेलियम विषबाधा प्रकरणातील संशयित म्हणून सुरेश पाटील यांनी महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह पाच जणांची नावे घेतली आहेत. यापैकी महापौर बनशेट्टी, त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी गुरुवारी पोलिसांत जबाब नोंदविला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यावेळी उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना श्रीशैल बनशेट्टी म्हणाले, पोलिसांनी मला विचारले की, या माणसाबरोबर तुम्ही कुठं कुठं जेवलात. मी माहिती दिली. आता जेवायला बसल्यानंतर माणसं एका पातेल्यातून भाजी घेतात. बरं ते जर त्यावेळी वाढताना कळालं नसेल तर या गोष्टी सांगायला या माणसाला आठ महिने का लागले. मुंबईतही त्यांनी अनेकदा पालकमंत्र्यांच्या घरी जेवण केलंय. कोणताही मुद्दा निसटू नये, याची काळजी घ्यावी. माझ्या माहितीप्रमाणे अलीकडच्या महिन्यात महापौर निवासस्थानी आलेले नाहीत, असेही बनशेट्टी यांनी सांगितले. 

जीवघेणी स्पर्धा ज्यांच्यासोबत झाली त्यांना कसं विसरला : प्रा. निंबर्गी 
प्रा. अशोक निंबर्गी म्हणाले, सुरेश पाटील आणि त्यांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. अध्यक्षपदावरून त्यांचा आणि माझा वाद झाला होता, हे त्यांनी फिर्यादीत म्हटलं आहे. पण धक्काबुक्की झाली असेल असं काही घडलेलं नाही. एखाद्या किरकोळ कारणासाठी जीवावर कशाला उठू. पण सुरेश पाटील यांचे कुणासोबत कसे संघर्ष झालेत, या घटनांचा मी साक्षीदार आहे. 

जीवघेणी स्पर्धा ज्यांच्यासोबत झाली त्यांना सुरेश पाटील कसे काय विसरले, हा माझा प्रश्न आहे. पोलिसांनी आम्हा पाच जणांची नार्काे टेस्ट करावी. त्यातून काही निष्पन्न झालं नाही तर सुरेश पाटील यांची नार्को टेस्ट करावी. त्यातून राहून गेलेले मुद्दे निश्चितपणे बाहेर येतील, याची आम्हाला खात्री आहे, असेही निंबर्गी यावेळी बोलताना म्हणाले. प्रा. निंबर्गी म्हणाले, मी राहतो मराठा वस्तीत आणि घडलो घोंगडे वस्तीत. या बातम्या आल्यानंतर सुरेश पाटील राहतात त्या घोंगडे गल्लीतील लोकांनी मला फोन केले. अण्णांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. महापौरतार्इंचं नाव त्यांनी घ्यायला नको होतं, असेही लोक म्हणाले. सध्या जे घडतंय ते दुर्दैवी आहे. आम्ही पोलिसांना सहकार्य करणार आहोत. ते जेव्हा बोलावतील तेव्हा पोलीस ठाण्यात जायला तयार आहोत. 

महापौरांनी बोलून दाखविला राजीनाम्याचा विचार
- सुरेश पाटील प्रकरणावरुन घडलेल्या घडामोडींचा अहवाल प्रदेश कार्यकारिणीला पाठविण्यात आला आहे. दरम्यान, महापौर शोभा बनशेट्टी यांनी या घडामोडींमुळे निराश होऊन राजीनामा देण्याचा विचार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे बोलून दाखविला आहे. गेल्या दीड वर्षात विविध विषयांवर प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. आता थेट बदनामी करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे या पदावरुन मुक्त करा, असेही त्यांनी सांगितले. परंतु, राजकारणात संघर्ष करावा. तुमच्या राजीनाम्याने तुम्हाला क्लीन चीट मिळणार नाही. न्यायालयात तुम्हाला निश्चित न्याय मिळेल, असे सांगून त्यांना माघार घ्यायला सांगण्यात आल्याचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाला सुरेश पाटील यांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती आहे. शिवाय, महापौर शोभा बनशेट्टी आणि इतर सहकाºयांसोबतही पक्ष खंबीरपणे उभा आहे. वरिष्ठ नेत्यांनी तसा निरोप पाठविला आहे, असेही निंबर्गी यांनी सांगितले. 

फेसबुकवर बदनामी.. दोघांविरुद्ध गुन्हा 
- संपूर्ण शहर व जिल्ह्यात गाजत असलेल्या विषबाधा प्रकरणाला अनुसरून एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर सुरेश पाटील यांच्याविषयी एकेरी भाषेत बदनामी करणारा मेसेज आला होता. त्यावरून सुरेश पाटील यांचे चिरंजीव बिपीन पाटील यांनी या बदनामीकारक मेसेजवरून जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अदखलपात्र तक्रार दाखल करून कावळे व हुंडेकरी नाव असलेल्या भाजपाच्या दोघा कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महापौरांना पुन्हा गहिवरून आले
- दुपारी २.३० वाजण्याच्या सुमाराला महापौर शोभा बनशेट्टी, त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी हे सर्व जण महापालिकेच्या गाडीतून जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात आले. मागोमाग काही कार्यकर्तेही आले. पोलीस ठाण्यात अडीच-तीन तास जबाब नोंदवून घेण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी इतर लोकांना बाहेरच थांबवून ठेवले होते. पोलीस ठाण्यासमोर माध्यमांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची गर्दी होती. या भागातून जाणारे लोक इथं नेमकं काय चाललंय याची माहिती घेत होते. सायंकाळी ५ वाजता सर्व जण पोलीस ठाण्यातून बाहेर आले. यानंतर महापौर शोभा बनशेट्टी माध्यमांसमोर आल्या. पण त्यांना गहिवरून आले आणि त्या गाडीत जाऊन बसल्या. श्रीशैल बनशेट्टी, अशोक निंबर्गी, शहाजी पवार आदींनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिल्या.

Web Title: Banshetty said, 'Sureshanna forgot to tell her at the home of the Guardian's house!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.