बापरे...कोरोनामुळे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:36 PM2021-04-18T16:36:27+5:302021-04-18T16:36:34+5:30
सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील निवडणूक शाखेतील शिपाई अण्णासाहेब विठ्ठल साबळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते ३५ वर्षांचे ...
सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील निवडणूक शाखेतील शिपाई अण्णासाहेब विठ्ठल साबळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते ३५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आठ वर्षाची मुलगी तसेच पाच वर्षाचा मुलगा, आई व बहिण असा परिवार आहे. साबळे यांच्या मृत्यूने जिल्हाधिकारी कार्यालयात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अत्यंत शांत आणि मृदू स्वभाव असलेल्या अण्णासाहेब साबळे यांच्यावर मागील १८ दिवसांपासून येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. छातीत दुखत असल्याने पहिल्यांदा ६ मार्च रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. एक दिवसाच्या उपचारानंतर ते घरी परतले. पुन्हा ४ ते ५ दिवसानंतर त्यांना त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरूच होते. मागील १८ दिवसांपासून येथील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. साबळे यांच्या घराची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे त्यांच्या उपचाराकरिता महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने सढळ हाताने मदत केली. सोसायटी मधून देखील त्यांना उपचाराकरता कर्जाची उपलब्धता करून दिली. त्यांच्या उपचाराकरता महसूल कर्मचारी संघटनेने शर्तीचे प्रयत्न केले. तरी त्यांचे प्राण वाचू शकले नाही.
अण्णासाहेब साबळे हे २००५ साली अनुकंपावर महसूल विभागात रुजू झाले. यापूर्वी त्यांचे वडील विठ्ठल साबळे हे अन्नधान्य वितरण विभागात शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर वडिलांच्या ठिकाणी अनुकंपावर अण्णासाहेब साबळे हे महसूल विभागात रुजू झाले.