बापरे; सोलापुरात पुन्हा एकदा दूध भेसळीचा प्रकार उघड; जाणून घ्या, कुठे टाकली 'एफडीए' ने धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:40 PM2021-04-10T16:40:27+5:302021-04-10T16:41:42+5:30
गोडेतेल, व्हे परमिट पावडरचा केला जात होता वापर
सोलापूर : येथील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पुन्हा एकदा दूध भेसळीचा प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान, ९ एप्रिल रोजी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदिपकुमार राऊत व अन्न सुरक्षा अधिकारी नसरीन मुजावर यांनी ज्ञानेश्वर दत्तात्रय करळे यांच्या मालकिच्या मे. अक्षय डेअरी (मु. पो. भोंणजे, ता. बार्शी, जि. सोलापूर) या ठिकाणी अचानक धाड टाकली. या धाडीत व्हे परमिट, खाद्यतेल वापरुन दुधामध्ये भेसळ केली जात होती. त्यांनतर न. त. मुजावर, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी भेसळयुक्त दुध या अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित दुध-६४०, लिटर, किंमत रुपये- १९२००/-, सुर्यफुल तेल- २३.४ किलो, किंमत रुपये- ३७७४/- व व्हे परमिट पावडर- ४५६ किलो, किंमत रुपये- ७२९६०/- असे एकूण एकत्रित किंमत रुपये-९५९३४/- चा साठा जप्त करुन ताब्यात घेतला. तसेच सदर भेसळयुक्त दुध हे नाल्यामध्ये ओतून नष्ट केले.
सदरची कारवाई अभिमन्यु काळे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई व सह आयुक्त (पुणे विभाग), पुणे शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदिपकुमार राऊत व अन्न सुरक्षा अधिकारी नसरिन मुजावर यांच्या पथकाने पूर्ण केली.