बापरे..मानहानी केल्याप्रकरणी मनोज शेजवाल यांच्याविरुद्ध पाच कोटीचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:13 PM2021-03-13T17:13:51+5:302021-03-13T17:14:38+5:30
कोणी? कशासाठी व कोठे दाखल केला दावा? वाचा सविस्तर
सोलापूर: खोटे आरोप करून मानहानी केल्याप्रकरणी नगरसेवक मनोज शेजवाल यांच्या विरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी पाच कोटी रुपये नुकसानभरपाईचा दावा मुख्य न्यायदंडाधिकारी कनकवडे यांच्या न्यायालयात दाखल केला आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे (वय 61, रा. अवंती नगर, जुना पुणे नाका) यांनी नगरसेवक मनोज भास्कर शेजवाल (वय 47, रा. रेल्वेलाईन, महापौर बंगल्याजवळ) यांच्याविरुद्ध क्रिमिनल प्रोसीजर कोड कलम 190 अन्वये व इंडियन पिनल कोड कलम 500,501 अन्वये पाच कोटी रुपयांचा फौजदारी खटला दाखल केला असल्याचे जिल्हाप्रमुख बरडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. शेजवाल हे शिवसेनेचे नगरसेवक असून त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात मोहोळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. त्यामुळे शिवसेनेने शेजवाल यांना पक्षातून निलंबित केले आहे.
तसेच शेजवाल यांच्याविरुद्ध कुंटणखाना चालवल्याचा गुन्हा दाखल असून सध्या तो न्यायप्रविष्ट आहे. शेजवाल यांनी 23 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन बरडे यांच्यावर अनेक खोटेनाटे आरोप केले आहेत. याबाबत विविध दैनिकात व वृत्तवाहिन्यावर बदनामीकारक बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. वास्तविक शेजवाल यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. शेजवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन केवळ बरडे यांची बदनामी व्हावी, त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात यावी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा व पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा विश्वास संपावा या हेतूने मानहानी व बदनामी केली आहे. त्यांच्या आरोपांमुळे बरडे यांना मानसिक त्रास झाला आहे. त्यामुळे शेजवाल यांना कडक शासन अथवा शिक्षा देणे न्यायाच्या दृष्टीने गरजेचे आहे, असे बरडे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या खाजगी फिर्यादीत नमूद केले आहे.