आमच्यावर बाप्पा रुसला, आता आई अंबे तूच कृपा कर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:24 AM2021-09-23T04:24:54+5:302021-09-23T04:24:54+5:30
करमाळा तालुक्यात जेऊर भागातील अनेक गावांमध्ये झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. यंदाही शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली आहे. गणेशोत्सव ...
करमाळा तालुक्यात जेऊर भागातील अनेक गावांमध्ये झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. यंदाही शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली आहे. गणेशोत्सव काळात एक टप्पा, नवरात्रौत्सवामध्ये दुसरा टप्पा आणि दिवाळी शेवटचा टप्पा अशा तीन टप्प्यात फुले येतील, असे नियोजन शेतकरी करतात. गेल्या वर्षी लॉकडाऊन असूनही झेंडूला उत्तम दर भेटला होता. गतवर्षी तर झेंडूच्या दराने उच्चांकी गाठत शतक पार केले. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले होते; मात्र या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये प्रतिकिलो दर पंचविशी पारही झालेला नाही, त्यामुळे आधीच कोरोनाने आणि लॉकडाऊनमुळे बेजार झालेल्या झेंडू उत्पादकांच्या पदरी प्रचंड निराशा पडली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
..................
खर्च परवडत नाही
झेंडू वाहतूक करण्यासाठी प्रतिकिलो पाच रुपये व तोडणीसाठी सरासरी चार रुपये खर्च येत असतो. त्यामुळे लागवडीचा, औषध, खत, फवारण्या यांचा विचार करता किमान पंचवीस ते तीस रुपये प्रतिकिलो दर मिळणे अपेक्षित आहे. त्याखाली दर मिळाला नाही तर खर्च भागवणे देखील मुश्किल आहे. दसरा आणि नवरात्रीच्या उत्सवात तरी बरा दर भेटेल, या आशेवर झेंडू उत्पादक सध्या डोळे लावून बसलेले आहेत.
..................
झेंडू लावण्यासाठी पूर्वमशागत, मजुरी, खते, औषध आणि वाहतुकीचा खर्च मोठा आहे. गणेशोत्सवात दर कोसळला होता. आता नवरात्रीच्या काळात किमान ५० रुपये दर भेटायला हवा. तरच झालेला खर्च हाती लागेल. अन्यथा फटका बसणार आहे.
- भारत अडसूळ, झेंडू उत्पादक