जानकरांनी फोडला मोहिते-पाटलांना घाम; मात्र शेवटच्या टप्प्यात ‘कमळा’त फुलला राम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 02:41 PM2019-10-25T14:41:50+5:302019-10-25T14:44:46+5:30
Malshiras Vidhan Sabha Election Results 2019: माळशिरस विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढाई; राम सातपुते यांचा निसटता विजय
राजीव लोहोकरे/ एल. डी. वाघमोडे ।
अकलूज/माळशिरस : विधानसभेच्या झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत अखेर भाजपचे राम सातपुते यांचा निसटता विजय झाला. राम सातपुते (भाजप) यांना १ लाख ३ हजार ५०७ तर उत्तमराव जानकर (राष्ट्रवादी) यांना १ लाख ९१७ मते मिळाली. त्यामुळे २५९० मतांनी राम सातपुते विजयी झाले. मागील निवडणुका पाहता हा सामना रोमहर्षक झाला. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच त्यांचा गड ढासळला आहे. तर भाजपने या ठिकाणी पहिल्यांदा खाते उघडले आहे; मात्र हा विजय राम सातपुतेसाठी मानाचा असला तरी, मोहिते-पाटील गटाला करावा लागलेला संघर्षाच्या दृष्टीने निसटता विजय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक संघर्षाची परंपरा जपत विरोधी गट विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता; त्यावेळी जानकरांनी अक्षरश: घाम फोडला होता; पण शेवटच्या टप्पात ‘कमळा’त ‘राम’ फुलला.
सकाळी ९ वाजता पहिल्या फेरीचा निकाल हाती येताच राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांनी ५ हजार ६९ मतांची आघाडी घेतली. हा आकडा वाढत जात १२ व्या फेरीत १६ हजार ५९७ मतांची आघाडी घेतली; मात्र १३ व्या फेरीपासून हा मतांचा आलेख खाली येऊ लागला. अखेर २१ व्या फेरीत २ हजार ८५३ मतांनी भाजपच्या राम सातपुते यांनी आघाडी घेतली. २२ व २३ व्या फेरीत मताधिक्य कमी झाले. २४ व्या फेरीत २ हजार ३११ मताधिक्य मिळविले तर अखेरच्या फेरीत २०६८ मतांची आघाडी मिळाली व पोस्टल ५२२ मतात आघाडी घेत २५९० मतांनी राम सातपुते विजय ठरले.
मतमोजणीसाठी दोन्ही गटातील नेतेमंडळी सकाळपासून मोठ्या उत्साहात मतदान केंद्रात दिसत होते. मतमोजणीचे निकाल हाती येत असताना भाजपमध्ये थोडे चिंतेचे वातावरण पसरले होते़ शेवटच्या काही फेºयांपर्यंत दोन्ही गटातील उत्सुकता कायम होती. भाजपचे उमेदवार राम सातपुते, धैर्यशील मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, के. के. पाटील, बाळासाहेब सरगर, हनुमंत सूळ, मिलिंद कुलकर्णी, काकासाहेब मोटे, नामदेव वाघमारे, राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांची अनुपस्थिती असली तरी त्यांचे प्रतिनिधी म्हणून अजय सकट, गौतम माने, बाळासाहेब लवटे, दादासाहेब वाघमोडे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राज कुमारसह अपक्ष उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मतमोजणीला प्रारंभ झाला.
मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. मतदान मोजणी कक्षात मोबाईल वापरण्यास बंदी होती. मतमोजणी केंद्रासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्ड यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. मतमोजणी गोदामापासून जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सकाळी ८़१५ वाजता सुरू झालेली मतमोजणी दुपारी ३ वाजता प्रक्रिया पूर्ण झाली.
- - सकाळपासूनच दोन्ही गटाच्या उमेदवारांसह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती़
- - सुरुवातीपासून उत्तमराव जानकर यांना लीड मिळत गेल्याने भाजप कार्यकर्ते चिंतेत
- - अखेरच्या क्षणी राम सातपुते विजयी झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
- - मतमोजणीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त
- - विजयी मिरवणूक न काढता अहिल्यादेवी होळकर पुतळ्यास पुष्पहार घालून गुलालाची उधळण, फटाक्याची आतषबाजी.