‘माने’ अखेर ‘यशवंत’ ठरले, विजयाचे शिल्पकार ‘अनगर’च बनले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 12:27 PM2019-10-25T12:27:58+5:302019-10-25T12:30:05+5:30
Mohol Vidhan Sabha Election Results 2019: मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विजयाची परंपरा कायम : मोहोळमध्ये २१,६९९ मतांनी राष्ट्रवादी विजयी
अशोक कांबळे
मोहोळ : देशात अन् राज्यात भाजपची सत्ता, जिल्ह्यात शिवसेना-भाजपकडे गर्दी असताना मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणून आपला एकनिष्ठपणा अभेद्य ठेवला़ या निवडणुकीत यशवंत माने यांना ९०,५३२ मते मिळाली़ २१ हजार ६९९ चे मताधिक्य मिळवून गेल्या पंचवीस वर्षांतील मोहोळवरचे वर्चस्व शाबूत ठेवण्यात पुन्हा एकदा राजन पाटलांनी यश मिळवले आहे़ माने यांच्या विजयाचे शिल्पकार अनगरकर बनले आहेत.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला येथील शासकीय गोडावूनमध्ये गुरुवारी सकाळी आठ वाजता निवडणूक निरीक्षक चंद्रपाल तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली़ १४ टेबलांवरुन २४ फेºया पार पडल्या़ प्रारंभी पोस्टल मते मोजली आणि त्यानंतर सिद्धेवाडीपासून मतमोजणीला सुरुवात झाली़ आष्टी जिल्हा परिषद गट, अनगर जिल्हा परिषद गट, नरखेड जिल्हा परिषद गट या तिन्ही गटात पाचव्या फेरीअखेर राष्टÑवादीचे उमेदवार यशवंत माने यांना १३ हजार ५९० मतांची आघाडी मिळाली़ मोहोळ शहर भागात सहाव्या फेरीत शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर यांना १,६५० मतांची आघाडी मिळाली होती. शेवटच्या बुथपर्यंत उत्तर सोलापूर व पंढरपूर या भागातूनही राष्ट्रवादीला आघाडी मिळत राहिली़ ही घोडदौड २१ हजार ६९९ मतापर्यंतही चालू राहिली.
राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सुरुवातीपासूनच आघाडी मिळत राहिली आणि बाहेर कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव सुरू झाला़ अनगर येथे माजी आमदार राजन पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी विजयी उमेदवार यशवंत माने यांचा सत्कार केला. या निकालामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश सूर्यवंशी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जीवन बनसोडे, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजिंक्य येळे, बाळासाहेब जाधव, निवडणूक नायब तहसीलदार राजशेखर लिंबारे, लीना खरात, सुरेश गायकवाड, मोईन डोणगावकर, मनोज पुराणीक, पंचायत समितीचे कक्ष अधिकारी वारगड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
उमेदवारांना मिळालेली पोस्टल मते
- - प्रेमनाथ सोनवणे - ४
- - यशवंत माने - ६८७
- - डॉ. हनुमंत भोसले - ५
- - नागनाथ क्षीरसागर - ४३७
- - कृष्णा भिसे - १
- - गौतम वडवे - ३३
- - अतुल मोरे - १
- - रमेश कदम - ७६
- - मनोज शेजवाल - ८
- - संजय खरटमल - २
- - नोटा - ४
उमेदवारनिहाय पडलेली मते
- यशवंत माने (राष्ट्रवादी) - ९०,५३२
- नागनाथ क्षीरसागर (शिवसेना)- ६८,५३४
- रमेश कदम (अपक्ष) - २३,५९७
- मनोज शेजवाल (अपक्ष)- ३, ८१६
- गौतम वडवे (वंचित आघाडी) - ६,४२३
- डॉ़ हनुमंत भोसले (मनसे) - १,४६६