"पवारांपुढे कधी झुकलो नाही आणि झुकणार नाही"; जयकुमार गोरे म्हणाले, "त्यांची गुलामगिरी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:36 IST2025-03-31T13:35:59+5:302025-03-31T13:36:12+5:30
Jaykumar Gore: एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे चर्चेत आले होते. जुन्या प्रकरणात विरोधकांकडून जयकुमार ...

"पवारांपुढे कधी झुकलो नाही आणि झुकणार नाही"; जयकुमार गोरे म्हणाले, "त्यांची गुलामगिरी..."
Jaykumar Gore: एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे चर्चेत आले होते. जुन्या प्रकरणात विरोधकांकडून जयकुमार गोरेंवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी घेताना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची माहिती देताना शरद पवार गटाच्या नेत्यांचा उल्लेख केला होता. आता जयकुमार गोरे यांनी एका सभेत बोलताना बारामतीचा उल्लेख करुन पवारांना लक्ष्य केलं आहे.
माण तालुक्यातील आंधळी येथील सत्कार समारंभात मंत्री जयकुमार गोरे बोलत होते. विरोधकांच्या षडयंत्रांकडे मी यापूर्वी जास्त मनावर न घेता दुर्लक्ष करायचो. पण आता कार्यक्रम केल्याशिवाय सुटीच नाही, असा निर्णय मी आता घेतला आहे, असं जयकुमार गोरे म्हणाले. मी बारामतीकरांच्या पुढं कधी झुकलो नाही अन् झुकणारही नाही, असा इशाराही यावेळी जयकुमार गोरे यांनी दिला.
"या लोकांवर माण खटावच्या लोकांवर प्रचंड प्रेम केले अशा बारामतीच्या लोकांना सगळ्यात पहिली कळ लागली आणि वाईट वाटायला लागलं की हा कसा करु शकतो, हा सामान्य कुटुंबातला आहे. हा कसा आमदार होऊ शकतो. आमदार झालोय हे १० वर्षे त्यांनी मान्यच केले नाही. आता मंत्री झालो हे त्यांना मान्य होत नाहीये. आजपर्यंत सगळ्या नेत्यांनी त्यांच्यासोबत तडजोड केली असेल पण पश्चिम महाराष्ट्रातील मी एकमेक जो कधीही पवारांच्या पुढे झुकणार नाही. माझं राजकारण संपलं तरी चालेल बारातमतीच्या पुढे कधी झुकणार नाही. बारातमतीच्या पुढे झुकलो असतो तर माझी आमदारकी सोपी झाली असती पण आपल्या शेतात पाणी आलं नसतं. त्यांची गुलामगिरी स्विकारली असती तर माण खटावच्या मातीत पाणी आलं नसतं. बारामतीच्या दारात जाऊन बसण्याशिवाय माझ्या हातात काही राहिलं नसतं. पण मी एकमेव गडी आहे जो कधी बारामतीची पायरी स्पर्श केलेली नाही,"असं जयकुमार गोरे यांनी म्हटलं.
"माझा विरोध बारामती आणि पवारांना नाही. ज्याने या मातीला पाण्यापासून वंचित ठेवले त्यांना माझा विरोध आहे. माझी लढाई माझ्या मातीच्या स्वाभीमानासाठी आहे. हा आनंद कमावण्यासाठी जयकुमार गोरेने संघर्ष करुन जेलमध्ये गेलो आहे. माझ्या व्यक्तिगत कामासाठी माझा संघर्ष झाला नाही. तुम्हाला वाटलंच असेल की माझं मंत्रिपद जाईल," असंही जयकुमार गोरे म्हणाले.