आॅर्केस्ट्राच्या नावाखाली सोलापुरात बारबालांची छमछम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:56 AM2018-11-14T10:56:39+5:302018-11-14T11:00:11+5:30
हे तर खुलेआम डान्स बारच: रात्री साडेबारापर्यंत परवानगी; पण सारेच थिरकतात पहाटेपर्यंत..
सोलापूर : संध्याकाळी दिवेलागणीनंतर सोलापूरच्या आॅर्केस्ट्रा बारमध्ये गाऊ लागतात गायिका... जशी जशी रात्र फुलत जाते, तसं हातातला माईक होतो बाजूला अन् पडद्यामागून आलेल्या बारबालांच्या पायातल्या घुंगरांचा सुरू होतो छमछमाट... होय. महाराष्टÑात डान्स बारला बंदी असतानाही कायद्याच्या नाकावर टिच्चून सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा सुरू झालाय या बारबालांचा उन्माद.
उत्तर सोलापूर तालुका राष्टÑवादी युवक उपाध्यक्ष सागर पवार यांनी डान्सबारमधील मारहाणीच्या मनस्तापावर विष प्राशन केले. सोमवारी त्यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर आॅर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालवले जात असलेले डान्स बार तरुणाईसाठी किती घातक ठरत आहेत, हे जाणून घेण्याच्या उद्देशाने ‘लोकमत’ टीमने जिल्ह्यातील डान्स बारचा घेतलेला शोध.
आॅर्केस्ट्रा म्हटलं की, कलेचा जागर असतो, मात्र या ठिकाणी आॅर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार सुरू झाले आहेत. आॅर्केस्ट्रा बारमध्ये कलाकार हे स्टेजवर बसलेले असतात. यामध्ये ७ महिलांना परवानगी असून त्या गायिका असाव्यात, असा नियम आहे. हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांच्या पसंतीनुसार त्यांनी विविध हिंदी किंवा मराठी गीतांचे सादरीकरण करणे अपेक्षित आहे. असे असताना हॉटेलमध्ये स्टेजवर ७ ते १४ मुली बसलेल्या असतात.
काही गायिका असतात तर काही नर्तिका (डान्सर) असतात. सुरुवातीला बारची सुरुवात ही गाण्याने होते. काही कालावधी गेल्यानंतर विशिष्ट पोशाखात मुली नृत्याला सुरुवात करतात. बारमध्ये आलेले ग्राहक या डान्स करणाºया मुलींवर पैसे उधळण्यास सुरुवात करतात. बाहेर आवाज जाणार नाही, अशा पद्धतीचा ध्वनिप्रतिरोधक हॉल बांधण्यात आलेला असल्याने आतमध्ये डान्स चालू आहे की नाही, लक्षात येत नाही. डॉल्बी सिस्टीमवर मोठ्या आवाजात गाणी लावली जातात. या गाण्यावर बारबाला डान्स करून ग्राहकांचे मनोरंजन करतात.
तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी २००५ मध्ये राज्यातील सर्वच डान्स बारवर बंदी घातली होती. मुंबईसह राज्यात डान्स बार बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. शहर व जिल्ह्यात एकाही डान्स बारला परवानगी नाही. ग्राहकांच्या मनोरंजनासाठी आॅर्केस्ट्रा बारला मंजुरी दिली जाते. शहरात एकूण ८ आॅर्केस्ट्रा बारला परवानगी आहे. जिल्ह्यात मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक तर बार्शी रोडवर दोन आॅर्केस्ट्रा बार सुरू आहेत. शहर हद्दीत पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शिवाजीनगर, केगाव, बार्शी रोड, सोरेगाव, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी आॅर्केस्ट्रा बार सुरू आहेत. रात्री साडेबारा वाजेपर्यंत वेळ असलेल्या या आॅर्केस्ट्रा बारची खरी सुरुवात रात्री दहा नंतर होते.
नृत्याला दाद देणारा खरा ग्राहक येण्यास सुरुवात होते. जेव्हा मद्य पोटात जाते तसा ग्राहकांचा मूड पाहून नर्तिका आपली कला सादर करण्यास सुरुवात करतात. मग काय पैशाचा पाऊस पडतो आणि बेधुंद वातावरणाची निर्मिती होते. जोपर्यंत पैशाचा पाऊस पडतो तोपर्यंत बारबालांची छमछम सुरू असते. कधी कधी पहाटे ५ वाजेपर्यंतही हा खेळ चालतो.
कर्नाटक राज्यातून येणाºया ग्राहकांची संख्या मोठी...
- शहर व जिल्ह्यातील आॅर्केस्ट्रा बारमध्ये असलेल्या मुली व महिलांचा डान्स पाहून मनोरंजन करण्यासाठी कर्नाटक राज्यातून अनेक ग्राहक येत असतात. कर्नाटकातील राजकीय नेते, बडे उद्योगपती आदी मोठमोठी असामी व्यक्ती सोलापुरात येतात. एका रात्रीत लाखो रुपयांची उधळण करून ही मंडळी निघून जातात. सीमेवर असलेल्या गुलबर्गा, विजयपूर, इंडी, बीदर आदी भागातून ग्राहक आॅर्केस्ट्रा बारमध्ये येतात.