सोलापुरातील चौपाटी जागेच्या वादामुळे बारगळे हुतात्मा चौक सुशोभीकरणाचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 12:53 PM2021-05-11T12:53:39+5:302021-05-11T12:53:42+5:30
२२ कोटी रुपयांची निविदा रद्द : स्टेडियमसह परिसराचा होणार होता कायापालट
सोलापूर : मुळे पॅव्हेलियनसह चार हुतात्मा पुतळा परिसराचा कायापालट करण्यासाठी स्मार्ट सिटीने २२ कोटी ७२ लाख रुपयांच्या कामाची निविदा काढली होती, परंतु पार्क चौपाटी जागेच्या वादामुळे ही निविदा रद्द करण्यात आली. हा निधी आता इतरत्र खर्च करण्याचे नियोजन सुरू आहे.
इंदिरा गांधी स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामने व्हावेत, यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून स्टेडियमचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यासाठी जवळपास ८ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. स्टेडियमच्या शेजारील जलतरण तलाव, जीमखाना, मुळे पॅव्हेलियन, पार्किंगची व्यवस्था यासह इतर कामांचे नियोजन यापूर्वीच करण्यात आले होते. यासाठी २२ कोटी ७२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या कामाची निविदा २८ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली. ६ मे रोजी प्री बीड मीटिंग बोलाविण्यात आली होती. या बैठकीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पार्क चौपाटीच्या जागेच्या वादाचा मुद्दा उपस्थित केला. या जागेचा ताबा घेण्यास खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी विरोध केला होता. जिल्हा न्यायालयातून स्थगिती मिळविली. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्याचेही सांगण्यात आले. हा वाद वेळेत निकाली निघणार नाही. त्यामुळे या कामाची निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी सांगितले.
या कामांचे नियोजन
जलतरण तलावाचे सुशोभीकरण, मुळे पॅव्हेलियन, शेजारच्या जुन्या इमारतींचे सुशोभीकरण, इलेक्ट्रिक कामे, जीमखान्याचे सुशोभीकरण, व्हॉलीबॉल, लॉन टेनिस कोर्टचे काम, पार्किंगची व्यवस्था, चार हुतात्मा पुतळा परिसराचे सुशोभीकरण, रस्त्याचे काम, चार पुतळा ते स्टेडियम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, ३० ते ४० शौचालयांचे काम, शुद्ध पाणी पुरवठ्याचे प्रकल्प्, इमारतींचे रंगकाम.
चौपाटीवरील विक्रेत्यांना पुरेशी जागा देऊन स्टेडियम परिसराचे सुशोभीकरण करण्याचा शब्द तत्कालीन आयुक्तांनी दिला होता. या संदर्भातील नियोजन विक्रेत्यांसमोर आलेच नाही. त्यामुळेच विक्रेत्यांनी न्यायालयात धाव घेतली. सोलापूरची चौपाटी जुनी आहे. त्यांना न्याय देऊन कामे होणार असेल, तर आमचा विरोध नाही.
- मनोहर सपाटे, संस्थापक, पार्क चौपाटी खाद्यपदार्थ विक्रेते कल्याणकारी संघटना.