पालखी तळासह पालखी मार्गालाही बॅरेगेटिंगचे सुरक्षा कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:15 AM2021-07-12T04:15:17+5:302021-07-12T04:15:17+5:30
मात्र यावर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका सहन करावा लागला. त्यामुळे प्रशासनाने मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही यात्रा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपाचा ...
मात्र यावर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका सहन करावा लागला. त्यामुळे प्रशासनाने मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही यात्रा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपाचा ठरवत प्रमुख संतांच्या १० पालख्यांना प्रवेश देण्याचे मान्य केले. मात्र यावर्षी वाखरी ते पंढरपूर या मार्गावर या प्रत्येक पालखीतील किमान ५० वारकऱ्यांना पायी चालण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे वाखरी पालखी तळासह वाखरी ते पंढरपूर या पालखी मार्गावर पालख्यांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ शकते, हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी मागील दोन दिवसांपूर्वी या सर्व स्थळांचा आढावा घेऊन सुरक्षा कवच तयार केले आहे.
त्यानुसार वाखरी पालखी तळाला पूर्ण लोखंडी, बांबूच्या साहाय्याने बॅरेगेटिंग करून फक्त दोन प्रवेशद्वार ठेवण्यात आले आहेत. तेथून पुढे पंढरपूरपर्यंत ठिकठिकाणी असलेले चौक, प्रमुख पालखी मार्ग, या पालखी मार्गाला जोडणारे उपनगरातील छोटे छोटे मार्गही बॅरेगेटिंगच्या साहाय्याने बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही नागरिकांना पालख्या मार्गावरून जात असताना प्रमुख पालखी मार्गावर येता येणार नाही, याची खबरदारी पोलीस प्रशासनाने घेतली आहे.
पोलीस प्रशासन सतर्क
आषाढी यात्रा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपाचा असला तरी अनेक भाविक गुप्त मार्गाने पंढरपुरात दाखल होण्याची शक्यता असल्यामुळे पालखी तळ व पंढरपूर शहरात गर्दी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. १७ ते २५ जुलैदरम्यान पंढरपूरला जोडणारे सर्व प्रमुख मार्ग, पालखी तळ, मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल २२५० पोलीस कर्मचारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या २००पेक्षा जास्त पोलीस अधिकाऱ्यांची बंदोबस्तासाठी नेमणूक केली आहे. आषाढीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.
कोट :::::::::::::::
वाखरी पालखी तळ, पालखी मार्ग व त्या त्या ठिकाणच्या चौकांमध्ये काही ठिकाणी तात्पुरते बॅरेगेटिंग लावण्यात येणार आहेत. तर काही मार्गांना बांबूच्या साहाय्याने बंदिस्त करण्यात येणार आहे. आषाढी यात्रेतील सुरक्षेसाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त मिळावा, यासाठी मागणी केली आहे. मागील वर्षीप्रमाणे कोणतीही गर्दी न होता प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करून हा सोहळा पार पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे. वाखरी ते पंढरपूर या मार्गावर पालख्यांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
- विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर
फोटो लाईन :::::::::::::::::::::::
वाखरी पालखी तळाला अशा प्रकारे बॅरेगेटिंगच्या साहाय्याने बंदिस्त करण्यात येत असल्याचे छायाचित्रात दिसून येत आहे.