बस्त्याची बार्शी...भांड्यांची सरशी; कोकणातला कच्चामाल रेल्वेनं कुर्डूवाडीत, तिथून बैलगाडीनं बार्शीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 11:55 AM2020-09-30T11:55:50+5:302020-09-30T11:57:52+5:30
विविध व्हरायटींची ग्राहकांना भुरळ : कारखानदारांनी केले मार्केटिंग
बार्शी : बार्शी शहरात एकूण २२ दुकाने आहेत. प्रत्येक भांडे दुकानदाराला आपल्या दुकानांमध्ये किमान १०० ते १५० प्रकारची भांडी ठेवावी लागतात़ त्यामध्ये चमच्यापासून पाणी तापविण्याच्या बंबापर्यंतचा समावेश असतो़ सध्याच्या ग्राहकांना व्हरायटी हवी असते, ती येथे पाहायला मिळते़ त्यामुळेच आजही बार्शीत भांडे खरेदीसाठी ग्राहकांचा ओढा आहे़ शिवाय बार्शीच्या कारखानदारांनीही त्याचे चांगलेच मार्केटिंग केल्याचे दिसून येते.
राजाभाऊ यवणकर यांच्या दुकान आणि कारखान्याची १२५ वर्षांची परंपरा आहे. पंचाहत्तरी ओलांडलेले राजाभाऊ म्हणाले, ४०-५० वर्षांपूर्वी कच्चामाल हा रेल्वेने रत्नागिरीहून कुर्डूवाडी येथे यायचा आणि तेथून बैलगाडीने बार्शी येथे आणला जायचा़ त्यावेळी लोखंडी घागरी, पाट्या अन् तवे अशा वस्तू बनविल्या जायच्या. मात्र नंतर पितळी घागरी, हांडे बनवायला सुरुवात केली.
उसाच्या रसापासून गूळ बनविण्यासाठी, हळकुंड उकळून हळद बनविण्यासाठी लागणारी मोठी कढई आम्ही बनवायचो. इंदापूरपासून बीडपर्यंत त्यांना ग्राहकांची मागणी होती. आमच्या कढया इतक्या प्रसिद्ध होत्या की त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी एका दौºयानिमित्त आल्यानंतर पाहिल्या व असा कारखाना सांगली भागात सुरू करा, असे वडिलांना सांगितले, असेही त्यांनी सांगितले़
बार्शीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये मिलिंद पाठक यांचा अॅल्युमिनियमची भांडी बनविण्याचा कारखाना आहे़ या कारखान्यात ताट, डबे, चरवी, कढई या प्रकारची भांडी तयार होतात.
अडचणीमुळे नवी पिढी अन्य व्यवसायाकडे वळली
अलीकडच्या काळात कारखानदारी अडचणीत आली आहे, असे सांगत यवणकरांनी फॅक्टरी अॅक्ट फार जाचक आहे़ दहापेक्षा अधिक कामगार कारखान्यात ठेवल्यानंतर ईएसआय व पीएफ भरण्यापासून अनेक कायद्यांचे पालन करावे लागते़ कामगारांचे हित पाहिले पाहिजे, पण नियमात शिथिलतेचीही गरज आहे़ कारखानदारी आणि दुकान चालविताना येणाºया अडचणींमुळे नवीन पिढी आता इतर व्यवसायाकडे वळल्याचे राजाभाऊ यवणकर यांनी सांगितले.
म्हणूनच तांब्याच्या भांड्यांच्या मागणीत वाढ
बार्शीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये विभुते यांचा तांब्या-पितळेची भांडी बनविण्याचा खूप जुना कारखाना आहे़ कारखान्याची माहिती सांगताना तिसºया पिढीतील कुमार विभुते यांनी बाजारात नवे ट्रेंड येतात़ अलीकडे तांब्या-पितळेच्या भांड्यांचे आरोग्याच्या बाबतीमध्ये महत्त्व व आयुर्वेदाचे महत्त्व वाढले आहे़ त्यामुळे या भांड्यांमधून अन्न सेवन करणे व पाणी पिणे याला ग्राहक पसंती देऊ लागले आहेत़ या कारखान्यामध्ये तांब्या-पितळेची घागर व हंडा बनविले जातात़ पूर्वी पुणे व भंडारा येथून कारखान्यासाठी लागणारा कच्चामाल येत असे, त्यांनी सांगितले.