पोलिसांच्या विरोधात सोमवारी बार्शी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:27 AM2021-09-17T04:27:51+5:302021-09-17T04:27:51+5:30

त्यांनी दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, मागील एक महिन्यापूर्वी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी रामदास ...

Barshi closed on Monday against police | पोलिसांच्या विरोधात सोमवारी बार्शी बंद

पोलिसांच्या विरोधात सोमवारी बार्शी बंद

googlenewsNext

त्यांनी दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, मागील एक महिन्यापूर्वी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी रामदास शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बार्शीत हजर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी शहरात फेरफटका मारताना येथील नागरिक व व्यापाऱ्यांना शिस्त नाही, असे सांगत शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा इरादा बोलून दाखविला होता. या संदर्भात त्यांनी मागील १० दिवसांपासून रस्त्यावर दुकानासमोर उभी असलेली वाहने, दुकानाच्या बाहेर आलेली अतिक्रमणे लक्ष्य करून शहरात पेट्रोलिंग सुरू केले होते. मात्र हे करीत असताना त्यांनी व्यापाऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलणे, शिवीगाळ करणे, माणसात अपमानित करणे असे प्रकार सुरू केले होते, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

तसेच ऐन गणेशोत्सव व गौरीच्या सणाच्या काळात त्यांनी रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे छोटे विक्रेते, हातगाडीवाले यांनादेखील टार्गेट केले होते. त्यामुळे लक्ष्मी येण्याच्या आदल्या दिवशी बंद करण्याची बैठक घेऊन व्यापाऱ्यांनी निश्चित केले होते. मात्र आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी यांनी त्यात मध्यस्थी करून सणाच्या काळात बंद करू नका, आपण पोलीस, नगरपालिका प्रशासन व व्यापारी यांची संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते.

...............

गेल्या आठ-दहा दिवसांपासून बार्शी शहर पोलिसांकडून गेल्या पाच-पन्नास वर्षापासून रस्त्यावर बसून पोट भरणाऱ्या छोट्या विक्रेत्यांना त्रास देणे, व्यापाऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलणे, त्यांना अपमानित करणे असे प्रकार सुरू आहेत. गेल्या ५० वर्षांपासून रत्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या या छोट्या विक्रेत्यांनी काय करायचे? व्यापाऱ्यांना काही किमत आहे की नाही? पोलिसांची भाषा बरोबर नाही, त्यामुळे या निषेधार्ह सोमवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी घेतला आहे.

- सुभाष लोढा, अध्यक्ष व्यापारी महासंघ

................

मी व्यापाऱ्यांना शहरातील वाहतुकीच्या कोंडीच्या संदर्भात बैठक घेऊन त्यामध्ये निर्णय घेऊ असे सांगितले होते. यानंतरही त्यांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. अद्याप तरी माझ्याकडे याबाबत काही लेखी निवेदन वगैरे आलेले नाही.

रामदास शेळके, पोलीस निरीक्षक, बार्शी शहर

Web Title: Barshi closed on Monday against police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.