बार्शीचा विस्तार पोहोचला नऊ गावांच्या वेशीपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:50 AM2021-02-05T06:50:53+5:302021-02-05T06:50:53+5:30
बार्शी : दक्षिणोत्तर राज्यांशी जोडलेली उतारपेठ अशी पूर्वापार ओळख असणारी बार्शी शहर दक्षिण भारताची उत्तर काशी, शैक्षणिक माहेरघर, ...
बार्शी : दक्षिणोत्तर राज्यांशी जोडलेली उतारपेठ अशी पूर्वापार ओळख असणारी बार्शी शहर दक्षिण भारताची उत्तर काशी, शैक्षणिक माहेरघर, मेडिकल हब म्हणून जिल्ह्यात अग्रेसर आहे. शहराच्या उत्तरेला गाताचीवाडी, पश्चिमेला खांडवी अलीपूर, नागोबाची वाडी, वायव्येला लक्ष्याचीवाडी, गाडेगाव, दक्षिणेला कासारवाडी, तर पूर्वेला जामगावच्या पुढे आणि दक्षिण पूर्वेला कदम वस्तीपर्यंत रहिवासी वस्ती व प्लॉटिंग आणि औद्योगिकरण नऊ गावांच्या वेशीपर्यंत विस्तारले आहे.
सहा दशकांचा इतिहास असणारी बाजार समिती, तीन सहकारी औद्योगिक वसाहती, जिल्हा दूध संघाचा सरकारी प्रकल्प व खासगी उर्जित दूध उद्योग, कृषिनिष्ठ उत्पादनांच्या कारखानदारीमुळे, अन्नप्रक्रिया उद्योगापासून ते अत्याधुनिक दुचाकी, चारचाकी बहुउद्देशीय कंपन्यांच्या वितरकापर्यंत सर्वांगाने बार्शीची उद्यमशीलता वाढली आहे.
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे संस्थापित शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, कर्मवीर लोहकरे गुरुजींच्या शिवाजी शिक्षण मंडळापासून बारबोले बंधूंच्या यशोदा शिक्षण प्रसारक मंडळापर्यंत या शहरातील शैक्षणिक संस्था समूहांची गुणवत्तापूर्ण वाढ झाली आहे.
आशिया खंडातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे कॅन्सर हॉस्पिटल, राज्यातील सहकारी तत्त्वावरील पहिले डॉ. हिरेमठ हॉस्पिटल, डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटल व अनेक खासगी हॉस्पिटल्समुळे बार्शी शहर मेडिकल हब बनले आहे. सोलापूर - उस्मानाबाद जिल्ह्यातून नागरिकांची बार्शी शहरात स्थायिक होण्याची संख्या ही विविध कारणांमुळे वाढली आहे.
-----
का आणि कशी वाढली बार्शी ?
आगळगाव रोड, लातूर रोड, कुर्डूवाडी रोड, तुळजापूर रोड याठिकाणी बहुउद्देशीय कंपन्यांच्या वाहनांचे वितरक व कृषिनिष्ठ उत्पादकांच्या मोठमोठ्या एजन्सीज.
अलीपूर रोड, उपळाई रोड, परंडा रोड, रेल्वे स्टेशन रोड, कासारवाडी रस्ता, फपळवाडी रस्ता, ताडसौदणे रस्ता, गाडेगाव रस्ता या भागात लघु, मध्यम तसेच मोठे रहिवासी गृह प्रकल्प कार्यान्वित.
बाह्यवळण रस्त्यामुळे जड वाहनांच्या रहदारीचा ओघ झाला कमी.
शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गांमुळे
हॉटेलिंग कल्चरमध्ये वाढ.
महानगरांमध्ये मिळणाऱ्या वैद्यकीय उपचारांची सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमुळे सोय.
अखिल भारतातील भगवंतरुपी हेमाडपंथी पुरातन मंदिर बनले हजारो यात्रेकरूंचे श्रद्धास्थान.
आंतरराष्ट्रीय नामांकीत शिक्षण संस्था अलीपूर, ताडसौदणे रोड, लातूर रोड येथे सोय.
---
उच्च माध्यमिक शिक्षण मी जेव्हा बार्शीत घेतले तेव्हापासून आजमितीस काही भाग हद्दवाढ झाला. रहिवासी वस्ती, शैक्षणिक व औद्योगिक वाढ आणि लोकसंख्या व रहदारी यांचा विचार केला तर आजची परिस्थिती आणि तेव्हाची परिस्थिती यामध्ये अक्षरशः जमीन आणि आकाश याचा फरक काय असतो, हे लक्षात येते.
- डॉ. बी. वाय. यादव
ज्येष्ठ सर्जन
---
लोकसंख्या आणि नागरी वस्ती वाढण्याबरोबरच औद्योगिकीकरण वाढले पाहिजे. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. नव्याने येणाऱ्या उद्योगांसाठी राजकीय पाठबळाची आवश्यक्ता आहे.
-रामचंद्र सोमानी
ज्येष्ठ व्यापारी