बार्शी-लातूर, बीड महामार्ग शेतकऱ्यांनी अडविला; जाणून काय आहे नेमकं कारण
By Appasaheb.patil | Published: September 19, 2022 11:50 AM2022-09-19T11:50:36+5:302022-09-19T11:50:47+5:30
लोकमत न्युज नेटवर्क
सोलापूर : अतिवृष्टीतून वगळलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व पिकविम्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली बार्शी-लातूर, बीड या राष्ट्रीय मार्गावरील जामगाव ( आ) येथील चौकामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत. या ठिकाणी सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू झालेले आहे.
दरम्यान, रास्ता रोको आंदोलनामुळे बार्शी-लातूर-बीड मार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. या आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग आहे. मागील महिन्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. याचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. सरकारने मदतीची घोषणा केली, त्यानंतर प्रशासनाने पंचनामे केले मात्र अद्याप नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. एकीकडे शेतमालाला मिळणारा कमी भाव अन् सातत्यानं होणारे शेतीपिकांचे नुकसान यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास बार्शी-लातूर-बीड रस्ता अडविला अन् आंदोलन केले.