मनोज जरांगे कोणाची सुपारी घेतायत? आम्हाला गोळ्या घालणार का?; राजेंद्र राऊत पुन्हा भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 02:31 PM2024-09-09T14:31:02+5:302024-09-09T14:32:31+5:30
मनोज जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर आता आमदार राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार हल्लाबोल केला आहे.
MLA Rajendra Raut ( Marathi News ) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्यात मागील काही दिवसांपासून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असून या वादाला आता आणखी धार आल्याचं पाहायला मिळत आहे. बार्शीतील एका मराठा तरुणाला मारहाण झाल्याचा आरोप होत असून या मुद्द्यावरून नुकतीच मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता राजेंद्र राऊत यांच्यावर टीका केली. तसंच यामध्ये तथ्य आढळल्यास आम्हीही प्रत्युत्तर देऊ आणि त्या तरुणाच्या अश्रूंचा बदला घेऊ, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता. जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर आता आमदार राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार हल्लाबोल केला आहे.
"जरांगे पाटील म्हणतात तसा कोणताही प्रकार माझ्या तरी माहितीत नाही. मात्र असं काही घडलं आहे का, याबाबतची माहिती मी घेतो. परंतु जरांगे पाटलांचं वक्तव्य ऐकून मला तर आश्चर्याचाच धक्का बसला. ते मला गोळ्या घालून माझी लेकरं रडवणार आहेत का? तशी सुपारी त्यांनी महाविकास आघाडीकडून घेतली आहे का? प्रत्येकला बघतो, मारतो, रडवतो अशा धमक्या ते देत आहेत. या महाराष्ट्रात लोकशाही आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान राहिलं आहे की नाही?" असा सवाल आमदार राजेंद्र राऊत यांनी विचारला आहे.
दरम्यान, "राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बार्शीत आधी दिलीप सोपल यांची भेट घेतली आणि नंतर त्यांची सभा झाली. त्यानंतरच आमच्या बार्शीत पेटवा-पेटवीचं राजकारण सुरू झालं आहे का, अशी शंका मला येत आहे," असा घणाघातही आमदार राऊत यांनी केला आहे.
जरांगे पाटील विरुद्ध राऊत संघर्ष
भाजपला समर्थन असलेले अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडीकडून लिहून घेण्याबाबत राऊत यांनी जरांगे पाटलांना आव्हान दिले होते. राजेंद्र राऊत म्हणाले होती की, 'माजलगावच्या सभेत तुम्ही म्हणाला राजेंद्र राऊतच्या घरासमोर सभा घ्यायला जागा आहे का पाहा, तुम्ही जर कोणाला मॅनेज होणार नसाल, महायुतीला पाडून महाविकास आघाडीला निवडून आणायचं पाप तुमच्या मनात नसेल तर तुम्ही महाविकास आघाडीकडून ओबीसीतून आरक्षण देण्याबाबतची भूमिका लिहून घ्या, देवेंद्र फडणवीस आणि महायुतीकडून भूमिका लिहून घ्यायची जबाबदारी माझी, त्यांनी लिहून दिलं नाही तर आमदार राजेंद्र राऊत राजकीय संन्यास जाहीर करेल', असं आव्हान राऊत यांनी जरांगे पाटील यांना दिले होते. त्यांनंतर जरांगे पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं.
दरम्यान, या वादानंतर बार्शी येथील मराठा बांधवांनी तब्बल ३०० गाड्याचा ताफा घेऊन शनिवारी अंतरवाली सराटी येऊन आमदार राजेंद्र राऊत यांच्याविषयी रोष व्यक्त केला. बार्शी येथे घोंगडी बैठक ठेवावी अशी विनंती बार्शी मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली.