Blast in Barshi Firecracker Factory: बार्शी हादरले! शोभेच्या दारू कारखान्यात स्फोट; पाच मृत्यू, २५ जण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 04:14 PM2023-01-01T16:14:55+5:302023-01-01T16:24:40+5:30
बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत शोभेच्या दारूचा कारखाना आहे
सोलापूर/बार्शी : जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत असलेल्या शोभेच्या दारू कारखान्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठा स्फोट झाला. या स्फोटात प्राथमिक माहितीनुसार पाच जण मयत झाले असून २० ते २५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात मयताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.
बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत शोभेच्या दारूचा कारखाना आहे. याठिकाणी फटाके, दारूगोळे तयार करण्यात येतात. याठिकाणी रविवार १ जानेवारी २०२३ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, किमान पाच ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे सांगण्यात आले. बार्शीतील अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून पोलिसांची टीमही दाखल झाली आहे. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात येत आहे. मोठया प्रमाणात आग लागल्याने मयताची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. कारखान्यातून आगीचे लोट मोठ्या प्रमाणात येत असल्याने बचावकार्यास अडचणी निर्माण येत आहेत. दुपारी ४ पर्यंत ४ मृतदेह कारखान्यातून बाहेर काढण्यात आले होते तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.