बार्शी-सोलापूर रस्ता पडला बंद; सौंदरे जवळील रस्ता पावसाच्या पाण्यात गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 12:54 PM2021-07-18T12:54:54+5:302021-07-18T12:56:14+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
बार्शी - बार्शी शहर व परिसरात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने बार्शीच्या तिन्ही बाजूंच्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
सोलापूर रस्त्यावर शहरापासून काही किमी अंतरावर असलेला सौंदरे गावाच्या अलीकडील पुलाचे काम सुरू असल्याने तात्पुरत्या प्रवासासाठी तयार करण्यात आलेला सर्व्हिस रोड या पावसाच्या पाण्याने वाहून गेल्याने मध्यरात्री पासून मोठ्या वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे. तर बार्शी लातूर रोडवरील लक्ष्मीनगर येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने बार्शी लातूर रोड वरील वाहतूक ही रात्रभर बंदच होती. बार्शी तुळजापूर रस्त्यावर असलेला कदमवस्ती येथील रस्ता ही खचला आहे.
बार्शी-सोलापूर रोडचे काम सुरू आहे. शनिवारी रात्रीच्या पावसामुळे सौंदरे शिवारातील सर्व पाणी या पुलातून जाते मात्र पुलाचे काम सुरू असल्याचे तात्पुरता तयार केलेला रस्ता खचला त्यामुळे मध्यरात्री पासून वाहतूक ठप्प झाली आहे. केवळ छोटी व दुचाकी वाहने ये-जा करत आहेत. लातूर रोडवर ही मोठ्या प्रमाणावर पुलावरून पाणी वाहत असल्याने लक्ष्मी नगरचा पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे रात्रभर वाहतूक बंद होती. सकाळी पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरू झाली.
सौंदरे येथील रस्त्याचा काही भाग पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्याठिकाणी मुरूम टाकून रस्ता भरण्याचे काम सुरू आहे.