अत्यावश्यक वस्तूंसाठी बार्शीकरांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:22 AM2021-04-07T04:22:49+5:302021-04-07T04:22:49+5:30
बार्शी : अत्यावश्यक सेवावगळता इतर सेवा-सुविधांच्या दुकानांचा लॉकडाऊनला प्रतिसाद मिळाला. मात्र अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी उसळली. प्रत्यक्षात या ...
बार्शी : अत्यावश्यक सेवावगळता इतर सेवा-सुविधांच्या दुकानांचा लॉकडाऊनला प्रतिसाद मिळाला. मात्र अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी उसळली. प्रत्यक्षात या व्यापारपेठा बंद ठेवण्याला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवारी सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बेकरी, दूध डेअरी, भाजीपाला, किराणा दुकाने, खाद्यपदार्थ, मेडिकल यासारखे अत्यावश्यक सेवावगळता ग्रामीण भागात सर्व बंद आहे. या निर्णयामुळे व्यापारीवर्गात मात्र अस्वस्थता दिसून आली. बाजारपेठेत व्यापारी व दुकानातील कामगार दुकानासमोर बसून गप्पा मारतानाचे दिसून आले.
मंगळवारी किराणा बाजारात व फळ बाजारात मोठी गर्दी झाली होती. बाजारात दुचाकींवर फिरणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. लोक विनाकारण फिरत आहेत. कापड बाजार, भांडी दुकाने, सराफ कट्टा, लोखंड गल्ली, दुचाकी वाहनांची तसेच ट्रॅक्टरची शोरूम ही पूर्णपणे बंद होती. मात्र तरीदेखील या गल्लीत व्यापारी दुकानासमोर बसल्याचे दिसत होते. पालिकेच्या व पोलिसांची वाहनेही बंदबाबत आवाहन करीत फिरत होती. व्यापाऱ्यांच्या हालचालींवर पोलिसांनी करडी नजर ठेवली होती.
---
अन्यथा दुकाने उघडी ठेवू : लोढा
अचानक लागलेल्या लॉकडाऊनला बार्शीतील व्यापारी असोसिएशनने विरोध दर्शविला आहे. बार्शीतील बाजार समितीत भांडी, कपडे, स्टेशनरी आणि कटलरी, मशिनरी, सराफ असोसिएशन या व्यापारी संघटनांची बैठक झाली. यात आज प्रशासनाला निवेदन देऊन लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्यावा. दोन दिवसात दुकाने उघडी ठेवणार आहोत. प्रशासनाला काय कारवाई करायची ते करू द्या, असा निर्णय सर्व संमतीने झाल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लोढा यांनी सांगितले.
----
जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहोत. जे व्यापारी नियम मोडतील त्यांच्यावर कडक कारवाई होईल.
- अमिता दगडे-पाटील
मुख्याधिकारी, नगरपरिषद
----
०६ बार्शी कोरोना
बार्शीतील व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला प्रतिसाद मिळाला; मात्र जीवनावश्यक वस्तूंसाठी सर्वसामान्यांनी अशी गर्दी केली.