अबुधाबीहून आलेल्या बार्शीकराला मुंबईतून सोडले;सोलापूरच्या प्रशासनाने मात्र सिव्हिलमध्ये हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 10:58 AM2020-03-19T10:58:25+5:302020-03-19T11:02:06+5:30
कोणतीही रिस्क न घेण्याची तयारी; आता फक्त तीन रुग्ण अॅडमिट, ७३ जण घरीच निगराणीखाली
बार्शी : दुबईवरून दोन दिवसांपूर्वी उक्कडगाव (ता़ बार्शी) येथे आलेल्या तरुणास निगराणीखाली ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने ताब्यात घेतले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र माळी यांनी दिली.
तो तरुण दुबईतील अबुधाबीमध्ये नोकरीनिमित्त गेला होता. दोन दिवसांपूर्वी तो गावी परतला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याची आरोग्य तपासणी करण्यात आली. कोणतीच लक्षणे नसल्याने १५ दिवस घरीच राहण्याबाबची सूचना देऊन मुंबई आरोग्य विभागाने त्याला गावी जाण्यास परवानगी दिली आहे. पण तो गावी आल्यावर आरोग्य विभागाला माहिती मिळाल्याने जिल्हा प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे पांगरी रुग्णालयात त्याची आरोग्य तपासणी करण्यात आली व मागील इतिहास तपासून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
तो तरुण ठणठणीत असून, सध्या कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी निगराणीखाली ठेवण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. याचबरोबर बार्शी शहरातील एका संशयिताला बार्शीच्या ग्रामीण रुग्णालायत स्वतंत्र कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
‘त्या’ क्लिपमुळे चर्चा
मंगळवारी बार्शीतील एका तरुणाने सोशल मीडियावर एक वादग्रस्त आॅडिओ क्लिप प्रसारित केली आहे. या क्लिपमधील व्यक्तींच्या संवादामुळे शहरात चर्चा सुरू झाली. याबाबत तक्रारी आल्यानंतर बार्शी नगरपरिषदेच्या वैद्यकीय अधिकाºयांनी संबंधितांचा शोध घेतला. त्या संशयितास बार्शी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आढावा बैठकीत प्रांत अधिकारी हेमंत निकम यांनी कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनातर्फे कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन केले.
शहर-जिल्ह्यात आता नव्याने रुग्ण आढळलेले नाहीत.
आतापर्यंत १० रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते. या संशयितांचे कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी ७ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. अद्याप तीन रुग्णांचा अहवाल येणे बाकी असून, ते अजूनही रुग्णालयात आहेत. त्यांची तब्येत ठीक आहे. २७ जणांना विशेष कक्षात निगराणीखाली ठेवण्यात आले होते. त्यापैकी २० विद्यार्थ्यांना यापूर्वीच त्यांच्या घरी नेऊन सोडण्यात आले आहे तर सात जणांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यावर बुधवारी त्यांनाही घरी पाठविण्यात आले आहे. याशिवाय संशयित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ८८ जणांना घरातच निगराणीखाली ठेवण्यात आले होते. त्यातील १५ जणांची तब्येत ठीक असल्याने निगराणी काढली आहे. उर्वरित ७३ जणांचा दररोज तपासणी अहवाल घेतला जात आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंंधासाठी मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेतली आहे.
त्यामुळे नवीन संशयित आढळलेला नाही. पुणे व इतर ठिकाणाहून येणाºया प्रवाशांवर लक्ष ठेवले जात आहे तसेच लक्षणे आढळणाºया संशयितांचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण मोहीम जारी आहे.
आठवडा बाजार बंद करण्याचा निर्णय
- यापूर्वी नगरपालिका हद्दीतील आठवडा बाजार बंद करण्यात आले होते. ग्रामपंचायत हद्दीतील आठवडा बाजार सुरू होते. पण बाजारात होणारी गर्दी लक्षात घेता आठवडा बाजार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सर्व गावांमध्ये दवंडी दिली जात आहे. पण गावात अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा भाजीपाला व धान्य खरेदीचे व्यवहार सुरू राहणार आहेत. जनावरांचे बाजार व गर्दी होणारे आठवडा बाजार बंद राहणार आहेत.
लग्नाला हजर राहणाºयांची डायरीत नोंद आवश्यक
- १९ मार्च रोजी लग्नाची तिथी असल्याने शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी लग्नं होणार आहेत. या लग्न सोहळ्याला फक्त ५0 जणांनाच हजर राहण्याला परवानगी देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी लग्न असेल तिथे ग्रामपंचायत, नगरपालिका व महापालिकेचे कर्मचारी जातील व नियमाप्रमाणे लोक आहेत की नाही, याची खातरजमा करतील. नियमभंग करणाºयांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिला.