बार्शीत बनावट रेमडेसिविर जादा दराने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:22 AM2021-05-14T04:22:03+5:302021-05-14T04:22:03+5:30
अमित सुभाष वायचळ (जावळी प्लॉट, बार्शी,), निखिल राजकुमार सगरे (बळेवाडी, ता. बार्शी), विकास काशिनाथ जाधवर (जावळी प्लॉट, रा. बार्शी) ...
अमित सुभाष वायचळ (जावळी प्लॉट, बार्शी,), निखिल राजकुमार सगरे (बळेवाडी, ता. बार्शी), विकास काशिनाथ जाधवर (जावळी प्लॉट, रा. बार्शी) व कृष्णप्रसाद उर्फ भैय्या इंगळे (रा. येडशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
बार्शी शहर पोलिसांत चौघांवर फसवणुकीचा व औषध किंमत नियंत्रण याचे उल्लंघन या कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. यातील अमित वायचळ व कृष्णप्रसाद इंगळे यांना अटक करून न्यायाधीश आर. एस. धडके यांच्यासमोर उभे करण्यात आले. त्यांना न्यायालयाने १७ मे पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जादा दराने रेमडेसिविर विक्री केल्याची घटना ७ मे रोजी घडल्यानंतर याबाबत अन्न व औषध प्रशासन सोलापूर विभागाचे औषध निरीक्षक नामदेव भालेराव यांनी बुधवारी रात्री पोलिसांत तक्रार दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की येथील महेश पवार (रा. राऊत चाळ) यांच्या नातेवाईकास रेमडेसिविरची गरज असल्याने त्यांना निखिल सगरे हा ब्लॅकनी विकत असल्याची माहिती मिळाली. त्यास मित्राकरवी दोन इंजेक्शनची गरज असल्याचे सांगताच त्याने मित्राकडे असून ते घेऊन देतो. पण ते ५० हजाराला दोन मिळतील असे सांगितले. त्यानंतर हे पैसे फोन पे द्वारे बँक अकाऊंटवर पाठवताच सगरे यांनी दोन रेमडेसिविर आणून दिले. त्यानंतर पवार यांनी त्यावरील टोल फ्री नंबरवर फोन केला. परंतु तो अवैध सांगण्यात आले. यावरून हे इंजेक्शन बनावट असल्याचा संशय आला. त्याने बनावट रेमडेसिविर परत घेऊन पैसे परत देण्याची मागणी केली. दोन दिवस थांबले. त्यानंतर ५० हजारांपैकी गुगल पे द्वारे १५ हजार रुपये व ३५ हजार रुपये रोख स्वरुपात परत केले. त्यानंतर ११ मे रोजी पवार यांनी इतर कोणाचीही फसवणूक होऊ नये यासाठी झालेला प्रकार पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांना सांगितला.
त्यानंतर पोलिसांनी अन्न औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक यांना कळविले. त्यांनी येथे येऊन महेश पवार यांचेकडून दोन इंजेक्शन जप्त केली. त्यात पावडर असलेल्या ९ हजार ६००रुपयांच्या दोन बाटल्या जप्त केल्या. त्या बनावट असल्याने पोलिसांत अन्न औषध निरीक्षक नामदेव भालेराव यांनी चौघांविरुद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ननवरे करीत आहेत.
----
अन् टोल फ्री नंबरमुळे बिंग फुटले
- बनावट रेमडेसिविर घेऊन आरोपी बार्शीत कॅन्सर हॉस्पिटलजवळ आले. त्यांच्यापैकी निखिल याने दोन इंजेक्शन दिले. त्यावरील टोल फ्री नंबरवर इंजेक्शन घेणारे पवार यांनी फोन केला. दरम्यान, हा नंबर अवैध असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर हे इंजेक्शन बनावट असल्याचा संशय बळावला आणि नेमका प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
----