बार्शीत धडक मोहीम.. विनामास्क वावरणाऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:18 AM2021-04-03T04:18:46+5:302021-04-03T04:18:46+5:30
बार्शी: सर्वत्र वाढत असलेल्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे ...
बार्शी: सर्वत्र वाढत असलेल्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी शुक्रवारी बार्शीतील अधिकाऱ्यांसमवेत बाजारपेठेत पाहणी केली. यामध्ये १०७ जण विनामास्क फिरताना आढळले त्यांच्याकडून ७२ हजार रुपयांचा दंड वसूल केला. यात शहरातील मुख्य बाजारपेठेतील मोबाईल शॉपी एक महिन्यासाठी सील केले.
अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केल्या पाहणीत फळविक्रेतेही विनामास्क आढळल्यामुळे पाच-सहा विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई केली. पोलीस पथकाने व्ही. के. मार्ट, भवानी पेठ येथे ही भेट देऊन मॉलची पाहणी केली. विना मास्क ग्राहक आहेत का याची खात्री केली. एका ग्राहकाने मास्क खाली घेतल्यामुळे त्याला दंड आकारण्यात आला.
कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना मास्कशिवाय सोडू नये. प्रशासनाने दिलेल्या ग्राहक क्षमतेपेक्षा जास्त नाहीत ना याची पाहणी करुन नियम पाळण्याचे निर्देश दिले. यावेळी बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर, पोलीस निरीक्षक संतोष गिरी- गोसावी, वाहतूक पोलीस कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
-----
कोरोनाचे संकट रोखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. सर्वांनी आपली जबाबदारी समजून नागरिकांनी व्यापाऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या नियमाचे पालन करावे. मास्क वापरावे. दुकानदारानीही ग्राहकांना विना मास्क प्रवेश देऊ नये. अन्यथा दंड व आस्थापना सील करण्याची कारवाई करण्यात येईल.
- अतुल झेंडे, अप्पर पोलीस अधीक्षक
----
छोट्याशा दुकानात वीसजण
या छोट्याशा मोबाईल दुकानांमध्ये विक्रेते व ग्राहक असे मिळून एकूण २० जण उपस्थित होते सामाजिक अंतर देखील ठेवले नव्हते. ग्राहकांपैकी बऱ्याच जणांनी मास्कचा वापर केलेला नव्हता. दुकानात सॅनिटायझरही उपलब्ध नव्हते. या बाबींमुळे दुकान ३० दिवसांसाठी सील करण्यात आले.
कारवाईसाठी पथके तैनात
बार्शी शहरामध्ये पोलीस प्रशासनाकडून वेगवेगळी पथके तयार केली आहेत. त्यांच्याद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी दिवसभरात १०७ लोकांवर मास्क न वापरल्यामुळे कारवाई केली.त्यांच्याकडून ७२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी सांगितले.
----