बार्शीत खादी अन् वर्दी आमने-सामने, आमदार म्हणाले हे तालिबान नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:28 AM2021-09-16T04:28:46+5:302021-09-16T09:31:48+5:30
बार्शी शहर पोलीस स्टेशनला रामदास शेळके हे पोलीस निरीक्षक म्हणून मागील पंधरा दिवसांपूर्वी रुजू झाले आहेत. ते शहरात पेट्रोलिंग ...
बार्शी शहर पोलीस स्टेशनला रामदास शेळके हे पोलीस निरीक्षक म्हणून मागील पंधरा दिवसांपूर्वी रुजू झाले आहेत. ते शहरात पेट्रोलिंग करीत असताना भोसले चौकात गणपतीची आरती झाल्यानंतर काही कार्यकर्ते फटाके उडवत होते. त्याचदरम्यान शेळके त्याठिकाणी गेले असता शेजारीच असलेल्या कार्यालयातून आमदार राजेंद्र राऊत त्याठिकाणी आले. त्यावेळी शेळके यांनी कारवाई करा, असे पोलिसांना सांगितले. त्यादरम्यान आ. राऊत म्हणाले की, साहेब आरती केलीय, त्यावर शेळके यांनी गणपतीला चार माणसांची परवानगी आहे. पंचवीसची नाही. त्यावर साहेब हा भारत आहे, तालिबान नाही असे राऊत म्हणाले.
.........................
आमदार राजेंद्र राऊत अन् पोलीस निरीक्षक शेळके यांच्यातील बाचाबाची
आमदार राऊत म्हणाले, हा मंडप काय रस्त्यावर नाही, यापूर्वी हा गणपती रस्त्यावर असायचा. यावेळी सर्वच मंडळे आत गेली आहेत. याठिकाणी गणपतीच्या आरतीला पाच-सहा लोकं होती. वाढदिवस अजिबात नाही. पंचवीस माणसे कुठे आहेत दाखवा. तुम्ही प्रत्येक ठिकाणी जबरदस्ती करताय हे बरोबर नाही. आम्हीही नियमानेच वागतो. तुम्ही काय प्रत्येक ठिकाणी दुर्बिणीतून बघणार काय. मी एवढे अधिकारी बघितले; पण या पाच दिवसात अशी पद्धत पाहिली नाही. आमच्या इथल्या परंपरा वेगळ्या आहेत. कित्येक वर्षांपासून रस्त्यावर छोटे व्यावसायिक बसत आहेत. नियम तर सर्व देशातच आहेत. तुमच्याशी वाद घालायला काय तुमची अन् माझी भावकी आहे का, लोकप्रतिनिधी म्हणून लोकांसाठी बोलायचा मला अधिकार आहे. काही बदल करायचे असतील तर लोकांना विश्वासात घ्या. तुम्हाला अडवायचा विषय नाही. याउपर तुम्हाला काय करायचे ते करा, असे आमदार राजेंद्र म्हणाले.
....
पोलीस निरीक्षक शेळक यांनी हा कायदा काही माझा नाही. तो सरकारचा आहे. एसपी मॅडमलाही माहीत आहे. याठिकाणी पंचवीस लोक होेते वाढदिवस केला जात होता. व्यापाऱ्यांनी नियमांनी वागले पाहिजे. नियम मोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार. तुम्ही आमदार आहात. तुम्ही आदेश द्या, तुम्ही हे करू नका म्हणून तुम्ही विनाकारण रस्त्यावर माझ्याशी वाद घालून इश्यू करू नका. हा मंडळाचा विषय आहे. तुम्ही मधे पडू नका. तुमचे काही म्हणणे असेल तर लेखी द्या. पोलीस स्टेशनला या, अशा प्रकारे आमदारांच्या प्रश्नाला उत्तरे दिली. या दोघात पाच मिनिटे शाब्दिक बाचाबाचीचा संवाद भोसले चौकात सुरू होता.
............
मागील आठ दिवसांपासून पोलिसांनी बाजारपेठेत व्यापाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरून सर्वसामान्य छोट्या व्यावसायिकांना त्रास देणे सुरू केले आहे. अनेक वर्षांपासून छोटे व्यावसायिक रस्त्यावर बसून व्यवसाय करीत आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी व्यापारी, नगरपालिका व अधिकारी यांची बैठक बोलावून यावर मार्ग काढू, असे माझे म्हणणे आहे. वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याला आमचा विरोध आहे. मात्र व्यापाऱ्यांनाही नाहक त्रास झाला नाही पाहिजे. पोलिसांच्या या कारवाईच्या व त्यांच्या भाषाशैलीच्या विरोधात व्यापारी ऐन लक्ष्मीच्या सणात बंद ठेवायला लागले होते. मात्र मी व्यापाऱ्यांची समजूत काढली. पोलिसांच्या शिस्त लावण्याला माझा विरोध नाही. उलट त्याचे स्वागत आहे. फक्त विश्वासात घेऊन करा, असे माझे म्हणणे आहे.
- राजेंद्र राऊत, आमदार, बार्शी