बार्शीत राऊत-सोपल, सांगोल्यात पाटील- देशमुख, अक्कलकोटमध्ये कल्याणशेट्टी-म्हेत्रे गटात चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:20 AM2020-12-24T04:20:30+5:302020-12-24T04:20:30+5:30
माळशिरस तालुक्यात भाजप नेते विजयसिंह मोहिते-पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, सांगोल्यात सेनेचे आमदार शहाजीबापू पाटील ...
माळशिरस तालुक्यात भाजप नेते विजयसिंह मोहिते-पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, सांगोल्यात सेनेचे आमदार शहाजीबापू पाटील विरुद्ध शेकापचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख, अक्कलकोटमध्ये भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे तर बार्शीत भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत विरुद्ध माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या गटामध्ये सामना रंगणार आहे. याशिवाय त्या त्या तालुक्यातील स्थानिक आघाड्यांनाही महत्त्व असणार आहे.
राज्यात पंधरा हजार ग्रामपंचायती असून, जिल्ह्यातील ६५४ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून, १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीची गणिते जुळविण्याची रणनीती आखणे सुरू झाले आहे.
यंदा सरपंचांची निवडणूक थेट जनतेतून होणार नसून पारंपरिक पद्धतीने म्हणजे सदस्यांमधून होणार असल्याने त्याचे पडसाद कसे उमटतील, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल.
बार्शी तालुक्यातील ९६ ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ९० टक्के गावात आमदार राजेंद्र राऊत विरुद्ध माजी आमदार दिलीप सोपल यांच्या गटात लढती होणार आहे, तर काही गावात मिरगणे यांचा गट असल्याने ते स्वतंत्र लढणार की सोपल गटासोबत युती करून लढणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तालुक्यातील पानगाव, पांगरी, उपळाई, खांडवी, खामगाव, गौडगाव, उपळे दुमाला, रातंजन, शेळगाव (आर), बावी, मालवंडी या गावात लक्षवेधी लढती होणार आहेत.
माढा तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींपैकी ८२ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली असून, शिवसेनेचे नेते शिवाजी सावंत यांच्याकडे वाकाव, तर माळेगाव येथे संजय कोकाटे, उपळाई (खु) येथे कै. गणेश कुलकर्णी गट, निमगाव (मा) येथे दादासाहेब साठे, फुटजवळगाव येथे भारतानाना पाटील यांची, तर कुंभेज, महातपूर या गावांत सध्या ग्रामपंचायत सत्ता शिवसेनेची आहे. वरील ग्रामपंचायती सोडून सगळ्या ग्रामपंचायतींवर आ. बबनराव शिंदे यांच्या गटाचीच सत्ता सध्या आहे.
अक्कलकोट तालुक्यात आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या गटात चुरस असेल. शिवाय माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, जि. प. सदस्य मल्लिकार्जुन पाटील, माजी सभापती सुरेखा काटगाव यांची आपापले गाव ताब्यात ठेवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजप विरुद्ध महाआघाडी असे चित्र आहे. यात काँग्रेसचे सुरेश हसापुरे, हरीश पाटील, भाजप नेते आमदार सुभाष देशमुख, सेनेचे अमर पाटील, दिलीप माने आणि राष्ट्रवादीचे सुभाष पाटील, आप्पाराव कोरे यांच्या गटामध्ये या लढती होतील, अशी सध्याची स्थिती दिसते.
मोहोळ तालुक्यात माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्या गटात लढत होई्ल. याशिवाय मानाजी माने, उमेश पाटील यांचाही गट सक्रिय आहे. थोडक्यात राष्ट्रवादीच्याच स्थानिक गटामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतील, असे दिसते.
पंढरपूर तालुक्यात परिचारकांचे गाव खर्डी, भालकेंचे गाव सरकोली, कल्याणराव काळे यांचे वाडीकुरोली, राजूबापू पाटील यांचे भोसे या गावात लक्षवेधी लढती होतील. स्थानिक आघाड्यांवर भर असेल. काळे-भालके युती होऊ शकते. त्यांच्याविरोधात परिचारक गट असा सामना होईल, असे चित्र आहे.
माळशिरस तालुक्यात भाजप मोहिते-पाटील गट आणि राष्ट्रवादीचे उत्तम जानकर अशी दुरंगी लढत असू शकते. तसेच राष्ट्रवादीचे शंकर देशमुख आणि रामदास देशमुख यांचा गट येथे कार्यरत आहे. काही गावांमधून तेही पर्यायी आघाडी करू शकतात.
मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायतींवर सध्या स्व. आ. भारत भालके, आ. प्रशांत परिचारक, दामाजीचे अध्यक्ष समाधान आवताडे यांचे वर्चस्व आहे. येथे या गटा-तटाबरोबरच स्थानिक आघाड्यांचा सहभाग असणार आहे.
सांगोल्यात शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपकआबा साळुंखे, काँग्रेसचे प्रा. पी. सी. झपके आणि खा. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची ग्रामपंचायत निवडणुकीत युती असणार आहे, तर शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. यामुळे प्रामुख्याने पाटील-देशमुख गटात चुरस असणार आहे.
करमाळा तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका पक्षाच्या बॅनरखाली न लढवता गटाच्या नावावर लढवल्या जातात. कारण, येथे पक्षीय राजकारणाला फारसे महत्त्व दिले जात नाही. तालुक्यात आ. संजयमामा शिंदे, माजी आ. नारायण पाटील, माजी आ. जयवंतराव जगताप व रश्मी बागल असे चार गट सक्रिय राजकारणात कार्यरत आहेत. इथे शिंदे व जगताप गट एकत्र असल्याने ते एकत्र निवडणूक लढवतील, तर माजी आ. नारायण पाटील व बागल गट स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरणार असले तरी स्थानिक पातळीवर कोणता गट कोणाबरोबर युती करतो, हे सुद्धा पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
-----
आमने-सामने
अ - राजेंद्र राऊत विरुद्ध दिलीप सोपल
ब - विजयसिंह मोहिते-पाटील विरुद्ध उत्तमराव जानकर
क -शहाजीबापू पाटील विरुद्ध गणपराव देशमुख
ड -सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध सिद्धाराम म्हेत्रे आमने-सामने
----
आजी-माजींची प्रतिष्ठा
जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आजी-माजी आमदार, नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. पक्षीय नेत्यांनी आपापल्या गटांना सक्रिय करणे सुरू केले असून, जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर सत्ता काबीज करण्याचे मनसुबे आखले जात आहेत.