इंग्रजी शाळांना तोड देणारी बासलेगावची ज्ञानदान एक्स्प्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 03:28 PM2019-05-06T15:28:54+5:302019-05-06T15:30:42+5:30
चला.. चला.. चला..; शिक्षणवारीची बस आली, सारे शिकुया, पुढे जाऊया...
शंभुलिंग अकतनाळ
चपळगाव : आधुनिक तंत्रज्ञानाच्या भडिमाराने आजच्या युगात सगळेच हायस्पीड झाले आहेत. मग अशा वेळी शिकणारा विद्यार्थीदेखील मागे कसा राहील ? ही गरज ओळखून पालकवर्ग आपल्या पाल्यास अधिक हुशार करण्यासाठी वाट्टेल ते या तत्वावर इंग्रजी मीडियमच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी धडपडतात. मात्र ग्रामीण भागातील पालकवर्ग अनेक संकटांच्या विळख्यात सापडल्यानंतर बासलेगाव, ता.अक्कलकोट येथील जिल्हा परिषद शाळेने सर्वांगीण विकासासाठी चक्क ज्ञानदानाची एसटीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी उपलब्ध करून दिल्याने येथील पालकांना मोठा आधार मिळाला आहे.
हल्ली पालक वर्गामध्ये इंग्रजी शाळेविषयी वाढलेल्या आस्थेने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना अवकळा आली आहे. मग अशा कठीणप्रसंगी मुख्याध्यापिका सुनीता किरनळ्ळी यांनी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लालसिंगराव राठोड आणि पालकांच्या सहकार्याने दर महिन्याला बैठका आयोजित करतात. यातून शालेय विकासासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून नियोजन आखले जाते. याचाच एक भाग म्हणून मागील काही महिन्यांपूर्वी शाळेचे रूप बदलण्याच्या हेतूने उपलब्ध वास्तूला एस.टी.चे रूप देण्यात आले.याकामी लोकसहभागातून जवळपास पंधरा हजारांचा खर्च करण्यात आला. आणि तयार झाली....बासलेगावची ज्ञानदान एक्स्प्रेस...!
आजच्या घडीला या शैक्षणिक बसच्या प्रतिकृतीतून ऐंशी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे दिले जातात. पहिलीपासून सातवीपर्यंत शिक्षण देण्यासाठी मनोज कदम आणि कल्पना मोरे हे कृतिशील शिक्षक सतत कार्यशील असतात. मुख्याध्यापिका सुनीता किरनळ्ळी यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेत वर्षभर सतत उपक्रम पार पडतात. यामध्ये प्रामुख्याने थोर नेत्यांची जयंती-पुण्यतिथी, रॅली,कार्यानुभवाच्या माध्यमातून स्वनिर्मिती, विविध स्पर्धा, परिपाठ आणि विधायक कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकोपयोगी कार्याचे धडे दिले जातात.
या डिजिटल शाळेत इंग्रजी माध्यमाच्या शाळांप्रमाणेशिक्षण मिळत असल्याने पालकवर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येते.तसेच येथील शिक्षकदेखील सतत धडपडत असतात.लोकसहभागातून या शाळेत संगणक संच उपलब्ध आहे.यातून ग्रामीण भागातील मुले स्वत: हा संच हाताळतात. मराठी माध्यमाच्या शाळांची अवकळा दूर करण्यासाठी बासलेगाव, ता.अक्कलकोट येथील शाळेने नवोपक्रमातून विद्यार्थी व पालकांना आकर्षित केले आहे.याच अनुषंगाने इतर शाळांनीदेखील असे उपक्रम राबविल्यास भविष्यात जिल्हा परिषदेच्या शाळांना अच्छे दिन लवकरच येतील.