‘बसंती, खुले में न जा...’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 01:53 PM2018-12-26T13:53:44+5:302018-12-26T13:57:35+5:30
कुर्डूवाडी : स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी कुर्डूवाडीतील भिंती बोलायला लागल्या आहेत. ‘बसंती खुले में न जा...’ असा संदेश ...
कुर्डूवाडी : स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी कुर्डूवाडीतील भिंती बोलायला लागल्या आहेत. ‘बसंती खुले में न जा...’ असा संदेश देणाºया भिंती चितारल्या आहेत. ‘उघड्यावर शौचास करू नको’ असा सल्ला बसंतीला देणारा गब्बरसिंग शहरवासीयांसाठी चर्चेेचा ठरला आहे.
नगरपालिकेने या बोलक्या भिंती मोक्याच्या ठिकाणी रंगविल्या आहेत. सुमारे ४५ ते ५० भिंतींवर रंगकाम करण्यात आले आहे. भिंतींवरील संदेशात ‘प्लास्टिक कचºयाचा वापर टाळा, पर्यावरण नियम पाळा’, ‘शौचालय का करे प्रयोग, मिटे गंदगी भागे रोग’, ‘हागणदारीमुक्त गाव सारा, शौचास नाही थारा’ अशा विविध संदेशांचा समावेश आहे. या संदेशांकडे लक्ष जावे, यासाठी विविध चित्रेही काढण्यात आली आहेत.
याचा सकारात्मक परिणाम दिसायला लागला आहे. शहर कचराकुंडीमुक्त झाले आहे. कचरा टाकण्याच्या ठिकाणांवर सकाळी भल्या पहाटे झाडलोट करून सुरेख रांगोळी काढण्यात येत असल्यामुळे नागरिकांनी कचरा टाकणेच बंद केले आहे.
कचरा टाकण्याच्या ठिकाणी बेंचेस बसविण्यात आले आहेत. लालू काका बोळ, नूतन शाळा बोळ, स्मशानभूमी रोड, कब्रस्तान रोड, नेहरुनगर, करमाळा रस्ता, भीमनगर या मार्गावरील हागणदारी दूर झाली असून, परिसर दुर्गंधीमुक्त होत आहे.
नागरिकांचे होतेय मनपरिवर्तन....
च्स्वच्छता समन्वयक मेघा स्वामी, आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण व कर्मचाºयांनी एकत्र बसून ही बोधवाक्ये बनविली आहेत. बालोद्यानमधील पाण्याच्या टाकीखाली ‘स्वच्छता अपनाओ, स्वच्छता अपनाओ... अपने घर को सुंदर बनाओ’ या चित्रात लहान निरागस मुले खराटा घेऊन उड्या मारताना दिसत आहेत. बालोद्यानमध्ये आलेली लहान मुले या चित्राकडे आकर्षित होत आहेत. ‘नट नट नटल्या माकडीन बाई, स्वच्छतेचा संबंध नाही’, ‘कचरा टाकून रस्त्यावर, शायनिंग मारते फेसबुकवर’ असे बोचरे संदेशही चित्रांसोबत आहेत. नागरिक मजा म्हणून वाचत असले तरी त्यांचे मत व मन परिवर्तन होऊन स्वच्छतेचे महत्त्व पटायला लागले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत आपले कुर्डूवाडी शहर अधिक सुंदर दिसत आहे. यात कचºयाचे संकलन, विलगीकरण व व्यवस्थापनाचे काम सरू आहे. नागरिकांत स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवित आहोत.
- समीर मुलाणी, नगराध्यक्ष कुर्डूवाडी नगरपरिषद