सावधान! पॉर्न साईट्स क्लिक करताय? गुन्हा दाखल होऊन अटकेतही जाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 05:07 PM2021-12-30T17:07:06+5:302021-12-30T17:08:19+5:30
सायबर पोलिसांची करडी नजर : चाईल्ड पॉर्न व्हिडिओ व्हायरल केल्याने झाली होती अटक
सोलापूर : सध्या अल्पवयीन मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात ॲन्ड्रॉईड मोबाईल आला आहे. त्यामुळे त्यातील इंटरनेटचा वापर प्रत्येकाला पाहिजे तसा करण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. मात्र, सावधान! पॉर्न व्हिडिओ जर सार्वजनिक ठिकाणी पाहात असाल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. सोलापुरात चाईल्ड पॉर्न व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल हाेऊन अटक झाली होती.
अशा कृत्यांवर सायबर सेलच्या पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. पोर्नोग्राफी म्हणजे अश्लील चित्रपट आणि त्या संबंधित प्रकरणाशी भारतात कडक कायदे आहेत. अशा प्रकरणात गुन्हा दाखल करताना माहिती तंत्रज्ञान कायद्याबरोबर आयपीसीच्या विविध कलमांचाही समावेश केला जातो. तंत्रज्ञानात झपाट्याने होत असलेल्या बदलामुळे कायद्यामध्ये दुरूस्त्याही करण्यात आल्या आहेत. व्हिडिओ, ऑडिओ आणि इतर स्वरूपात अश्लील आणि लैंगीक शोषणाचा प्रसार करणारे साहित्य बनविणे, तसेच इतरांना पाठवणे हे पोर्नोग्राफी प्रतिबंधक कायद्याने गुन्हा आहे. अश्लील व्हिडिओ बनवणेही गुन्हा असून, चाईल्ड पोर्नोग्राफी बघणेही गुन्हा ठरवण्यात आला आहे. अलीकडच्या काळात चाईल्ड पोर्नोग्राफीचे प्रमाण वाढले आहे.
-------------
यानुसार होईल कारवाई....
याप्रकरणी आरोपी दोषी आढळल्यास सुधारित माहिती तंत्रज्ञान कायदा २००८मधील कलम ६७ (अ) भादंवि कलम २९२, २९३, २९४, ५००, ५०६ आणि ५०९ अन्वये शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. याप्रकरणी पहिल्यांदाच दोषी आढळलेल्या आरोपीला पाच वर्षांचा तुरूंगवास किंवा १० लाखाच्या दंडाची शिक्षा आहे. दुसऱ्यांदा असा गुन्हा केल्यास सात वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.
...तर तातडीने पोलिसांशी संपर्क साधा : उदयसिंग पाटील
० चाईल्ड पोर्नोग्राफी समाजासाठी धोकादायक असून, त्याचा प्रसार थांबला पाहिजे. चाईल्ड पोर्नोग्राफी कोणी पाहात असतील अन त्याचा व्हिडिओ जर इतरांना फॉवर्ड करीत असेल तर अशा लोकांची माहिती सायबर पोलिसांना द्यावी. संबंधित व्यक्तीवर तत्काळ गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील दिला आहे.
चाईल्ड पोर्नोग्राफीचा एक गुन्हा दाखल
० २०२१मध्ये सोलापुरातील एका तरूणाने चाईल्ड पोर्नोग्राफी इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. हा प्रकार दिल्ली येथील सायबर सेलच्या लक्षात आला होता. दिल्लीच्या सायबर सेलने तरूणाचा शाेध घेऊन साेलापूरच्या तरूणाला अटक करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलने तरूणावर कारवाई केली होती.