सावधान.. धुळकट अन् धुरकट वातावरणामुळे सोलापूरकरांची श्वसनलिका डेंजर झोनमध्ये !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 02:42 PM2018-12-06T14:42:25+5:302018-12-06T14:46:22+5:30
गंभीर विकारांचा धोका : प्रदूषणात सोलापूरचा क्रमांक टॉप टेनमध्ये; उपसंचालक म्हणतात, कृती आराखडा पाठविला
महेश कुलकर्णी
सोलापूर : वाढत्या धुळीमुळे सोलापूर शहराची ओळख धुळीचे शहर म्हणून होत चालली आहे. राज्यात सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत सोलापूर टॉप टेनमध्ये असल्याचा अहवाल प्रदूषण मंडळाचा आहे. शहरातील वाहनांची संख्याही वाढली असून, या वाहनांच्या धुरामुळेही शहरातील हवा प्रदूषित झाली आहे. धूर आणि धुळीच्या मिश्रणामुळे सोलापूरकरांचा श्वास कोंडत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
शहरातील प्रमुख रस्ते सिमेंटचे जरी असले तरी हद्दवाढ भागात आजही अंतर्गत रस्ते कच्चे आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुलीकण असतात. होटगी गावाच्या परिसरात अनेक सिमेंट कंपन्या असल्यामुळे होटगी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ असते. यामुळे दमा व श्वसनासंबंधीचे विकार वाढीस लागल्याचे डॉक्टर सांगत असले तरी प्रशासनाकडून या प्रकाराची फारशी गंभीर दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. शिवाजी चौक, पार्क चौक, रंगभवन, आसरा, सात रस्ता, कन्ना चौक, टिळक चौक, सत्तर फूट रोड, होटगी रोड याठिकाणी धूळ आणि वाहनांच्या धुरामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे.
हवेची गुणवत्ता खराब असलेल्या राज्यातील १० शहरांमध्ये सोलापूरचा समावेश आहे. वाढती धूळ, जाळलेला कचरा, प्लास्टिक व रासायनिक वस्तूंचे वाढते प्रमाण आणि वाहनांच्या प्रदूषणामुळे दमा, श्वसन विकार आणि फुप्फुस विकारांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. प्रदूषण, धूळ, धुराच्या संपर्कात आल्यामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, कफ वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखे आजार वाढत आहेत. वातावरणातील धूळ व धुराचा लहान मुले व वृद्धांना सर्वाधिक त्रास होत असून, त्यांना श्वसनाचे विकार जडत आहेत.
शहरात जवळपास सहा लाखांच्या आसपास वाहने आहेत. या वाहनांमधून ८५ हजार लिटर डिझेल-पेट्रोलचा वापर होतो. यामुळे निर्माण होणारा धूर शहरातील किती लोकांच्या आरोग्यावर परिणाम करत असेल हे सांगणे कठीण आहे. यामुळे सोलापूरकरांच्या श्वासात आॅक्सिजन जाते की धूर हेही सांगणे अवघड आहे.
धुळीमुळे आरोग्यावर होणारे परिणाम...
- धुळीमुळे होत असलेल्या त्रासामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न वाढला आहे. दवाखान्यात रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. शासकीय रुग्णालयातील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कांबळे म्हणाले की, धूळ श्वासावाटे शरीरात जाते. धूलिकण फुफ्फुसात जमा होतात. अॅलर्जीचा त्रास असणाºयांना सर्दी, खोकला, कफ होणे, धाप लागणे असे त्रास होतात, तर सर्वसामान्यांना सर्दी, खोकला आणि घशात दुखणे असे त्रास होत आहेत. या धूलिकणांचा दीर्घकालीन परिणाम म्हणजे श्वसनाची क्षमता कमी होणे, ब्राँकॉयटिस होणे. धूलिकण बराच काळ वातावरणात राहतात. हे धूलिकण श्वसनातून शरीरात, फुफ्फुसात, श्वासनलिकेत जातात. जरी श्वास घेताना तो फिल्टर होऊन जात असला तरी सूक्ष्म घटक आतपर्यंत पोहोचतात. हे खूप धोकादायक आहेत. याचे दुष्परिणाम तत्कालिक आणि दीर्घकालीन आहेत.
आरएसपीएमचे प्रमाण वाढले
- हवेचे प्रदूषण म्हणजे हवेतील धूलिकणांचे वाढलेले प्रमाण. शास्त्रीय भाषेत त्याला रेस्पायरेबल सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर अर्थात आरएसपीएम असे संबोधले जाते. प्रदूषणाच्या मानकानुसार आरएसपीएमचे प्रमाण २०० मायक्रो ग्रॅम प्रति घनमीटर असायला हवे. हे प्रमाण आता दुपटीवर गेले आहे. सण, उत्सवाच्या काळात हे प्रमाण तिपटीने वाढते.
सोलापूर शहर स्मार्ट होत असल्यामुळे महानगरपालिकेच्या सहकार्याने आम्ही हवा प्रदूषण कमी करण्यासाठी शहर कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये वाहतूक, इंधन, कचरा, धूळ या सर्वच बाबींचा समावेश आहे. महिन्यापूर्वी हा आराखडा राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. राज्याने तो केंद्राकडे पाठविला आहे. यावरच्या उपाययोजनांवर शासनाकडून लवकरच आदेश प्राप्त होतील.
- नवनाथ आवताडे,
उपसंचालक, प्रदूषण नियंत्रण मंडळ
ब्लॅक कार्बन, धुळीचे कण ठरताहेत घातक
- शहरांमधील वातावरणातील प्रदूषणाला कारणीभूत सल्फेट नायट्रेटस, कार्बन मोनोआॅक्साइड, ब्लॅक कार्बन, धुळीचे कण व मायक्रॉनचे पार्टिकल कण श्वसननलिकेमध्ये श्वासाद्वारे शरीरात शिरतात. त्यामुळे श्वसननलिका लालसर होते, आकुंचन पावते. यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी जागरूक होण्याची गरज आहे.
धुळीमुळे त्वचा आणि केस जाणे या दोन्हींच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. केस कोरडे होऊन तुटायला लागतात. हे टाळण्यासाठी हेल्मेट किंवा टोपी नेहमी वापरावी. यामुळे केस सुरक्षित राहतात. धुळीच्या पार्टिकल्समुळे चेहरा रखरखीत आणि कोरडा होतो. अशा वेळी जास्त साबण न लावता पाण्याने दिवसातून दोन-तीन वेळा चेहरा धुवावा.
- डॉ. नितीन ढेपे, त्वचारोग तज्ज्ञ