सावधान...पुढे धोका आहे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:42 PM2019-11-21T12:42:36+5:302019-11-21T12:43:08+5:30
माझी गरज ही केवळ माझ्या कुटुंबालाच नाही तर अवघा समाज राष्ट्राला माझी गरज आहे.
शनिवारचा दिवस होता...शाळा नियमितपणे सुरू होती...सकाळचे नऊ वाजले असतील... प्रचंड मोठा आवाज झाला. मी वर्गाबाहेर गेटच्या दिशेने धावलो. एक कार रिव्हर्स घेताना जोरात बंद गेटला धडकली. गेट लॉक असल्याने रॉड वाकला. तुटलाही असेल, काहीच कळत नव्हतं,कारण यावेळी लहान मुलं तिथं थांबतात कुणी नाही याची खात्री केली, हायसं वाटलं. एक टू व्हीलर माझ्या गाडीवर पडून टच झालं, संबंधित गाडीचंही डॅमेज झालं. रितसर पंचनामा वगैरे झाला. शाळेतून परतताना त्याच दिवशी कुत्रा,शेळी,सायकलवाले बºयापैकी आडवे आले.
सायंकाळी साडेसहा वाजता होटगी रोडवरुन जाताना रस्ता दुभाजक जागेतून एकजण वळला तर दुसरा आसºयाकडे जात होता. जोराची डॅश होऊन दोघेही पडले. सर्वांनी त्यांना व गाड्यांना बाजूला केलं. रात्री घरी परतताना कंबर तलाव पुलावर अॅक्टिव्हा स्लीप होऊन दोन तरुण खाली पडले. मागे कोणी नव्हतं हे बरं. या सर्व घटनांत सुदैवाने कोणासही गंभीर इजा व तितकं नुकसान नाही.
दोन्ही टू व्हीलर चालकांना हेल्मेट नव्हते, फोर व्हीलरचालक गाडी चालवण्याच्या स्थितीत नव्हता. या आणि अशा घटना वारंवार घडतात. खरंतर यात रस्त्याचा काही दोष नाही. रस्ते चांगले झाल्याने प्रगतीचा वेग वाढला पाहिजे पण आज मृत्यूचा वेग वाढताना दिसतो. आज आपण कोणतीही गाडी चालवताना केवळ स्वत: व्यवस्थित चालवण्याबरोबर समोरील चालकाच्या चालवण्याकडे लक्ष देणं ही आपलीच जबाबदारी आहे. कारण चालकांच्या डोक्यातील अनेक विचारांची गर्दी, वाढणारा वेग, हेल्मेटबाबत बेफिकिरी, बेशिस्त वाहतूक, पादचाºयांची,भाजीवाले, फेरी व गाडीवाले यांची रस्त्यावरील गर्दी. सर्वांना झालेली घाई,अगदी सिग्नलला हिरवा दिवा येण्याआधी बरेच लोक निघून गेलेले असतात. तेव्हा सर्वांच्या या कृती गंभीर आहेत. सावधान .. पुढे धोका. हे ब्रीदवाक्य मनात खूप बिंबवावं लागेल. जेव्हा अपघात होतात तेव्हा चूक कोणाची ? हे शोधण्यापेक्षा सावधानता महत्त्वाची आहे. कारण कधीकधी भरुन न निघणारे नुकसान होत असते.
आपल्या प्रवासाचे अंतर कितीही असू दे. वेळ, वेग व शिस्त महत्त्वाचीच. काम कितीही महत्त्वाचं असू दे त्यापेक्षा आपलं जीवन अनमोल आहे. आपण कुटुंब प्रमुख असाल तर आणखी जबाबदारी वाढते. घरी तुमची कोणीतरी वाट पाहतंय,यांचं भान अखंड असावं. अनेकदा इतरांच्या चुकांची शिक्षाही तुम्हाला भोगावी लागते. शांत राहा. स्वस्थ राहा,कारण आणखी त्रागा करून तुमचंच नुकसान होणार. काळजी घ्यावी लागेल. चिंतन करावंच लागेल कारण सावधान... पुढे धोका आहे.
गर्दीच्या ठिकाणी आणखी गर्दी आपण करु नये, खरेदीला गेल्यानंतर गाडी व्यवस्थित पार्क करावी. गाड्या ओव्हरलोड करू नये. घाटरस्त्यावर संपूर्ण सावधानता हवी,चढण चढणाºयांना आधी वाट द्यावी, वाहतुकीचे सर्व नियम तंतोतंत पाळावेच कारण सावधान पुढे धोका आहे.
चला आपण सारे आतापासूनच शुभसंकल्प करु या की मी सर्व वाहतुकीचे नियम पाळेन, गाडी चालवताना मी डोक्यात इतर कुठलाही विचार नाही ठेवता लक्ष रस्त्यावर ठेवेन. मी शिक्षित तर आहे थोडं जाणते व शहाणपणाने वागेन. माझी गरज ही केवळ माझ्या कुटुंबालाच नाही तर अवघा समाज राष्ट्राला माझी गरज आहे. या विचारांनी आपण आपलं व इतरांचं जगणं सुरक्षित व सुंदर करु शकतो आणि सारे जण ते करु. मग नक्कीच अशा प्रकारच्या अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होतील. तेव्हा सावधान.. पुढे धोका आहे याचा जरुर जरुर विचार करु या.
- रवींद्र देशमुख
(लेखक झेडपी शाळेत शिक्षक आहेत)