मिलिंदनगरमधील अस्थिविहाराचे होणार सौंदर्यीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:24 AM2020-12-06T04:24:00+5:302020-12-06T04:24:00+5:30
दि. ६ डिसेंबर १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर सोलापुरातील तत्कालीन कार्यकर्ते तुकाराम इंगळे व अन्य सदस्यांनी ...
दि. ६ डिसेंबर १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर सोलापुरातील तत्कालीन कार्यकर्ते तुकाराम इंगळे व अन्य सदस्यांनी मुंबई येथून त्यांचा अस्थिकलश सोलापुरात आणला होत्या. मिलिंदनगरातील पंचाच्या चावडीसमोर असलेल्या विहारामध्ये हा अस्थिकलश ठेवण्यात आला होता. गेल्या दहा वर्षांमध्ये या अस्थिविहाराची भव्य वास्तू उभी करण्यात आली आहे. विहारामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश असलेली रूम एसी करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. समोरील भागात भीमसृष्टी उभारण्यात आली आहे. अस्थिविहार सुंदर व मजबूत व्हावे यासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत संपूर्ण विहार आतील भागातून ग्रॅनाईटने सजवण्यात येणार आहे. शिवाय अंतर्गत पीओपीचे काम केले जाणार आहे. दुसऱ्या मजल्यावरील पत्रे काढून तेथेही अशाच पद्धतीने सजावट केली जाणार आहे. महाराष्ट्रात मुंबईनंतर सोलापुरात अशा प्रकारची भव्य अशी विहाराची वास्तू असणार आहे.
मिलिंदनगरातील विहारात साकारणार बुद्धसृष्टी
अस्थिविहारापासून काही अंतरावर असलेल्या बुद्धविहाराचेही भव्य वास्तूमध्ये रुपांतर होणार आहे. या बुद्धविहारात बुद्धदृष्टी साकारण्यात येणार आहे. यामध्ये तथागत गौतम बुद्धांचा जन्म झालेल्या इसवी सनपूर्व ५६३ पासूनचा इतिहास सांगणाऱ्या काही निवडक फोटोंचा समावेश असणार आहे.
अस्थिविहार मजबूत व सुंदर व्हावे यासाठी ग्रॅनाईटचे काम हाती घेण्यात आले आहे. अस्थिविहारात असलेल्या भीमसृष्टीनंतर प्रथमत महाराष्ट्रात बुद्धसृष्टी साकारण्याचा निर्णय घेतला आहे. थोरला राजवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या बुद्धविहाराची वास्तू दोन मजली करून त्यामध्ये बुद्धसृष्टी निर्माण करण्यात येणार आहे. अस्थिविहाराबरोबर बुद्धसृष्टीही पाहता येणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.
आनंद चंदनशिवे, नगरसेवक