फेसबुकवरून सुंदर मुली करतात चॅटिंग; त्यानंतर नग्न व्हिडिओ कॉल अन्‌ ब्लॅकमेलिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 11:31 AM2021-06-08T11:31:21+5:302021-06-08T11:32:32+5:30

अनेक तरुण पडत आहेत बळी : इभ्रत जाईल म्हणून देताहेत मागेल तेवढे पैसे

Beautiful girls chatting from Facebook; Then nude video calls and blackmailing | फेसबुकवरून सुंदर मुली करतात चॅटिंग; त्यानंतर नग्न व्हिडिओ कॉल अन्‌ ब्लॅकमेलिंग

फेसबुकवरून सुंदर मुली करतात चॅटिंग; त्यानंतर नग्न व्हिडिओ कॉल अन्‌ ब्लॅकमेलिंग

googlenewsNext

सोलापूर : फेसबुकवरून सुंदर मुली चॅटिंग करतात, त्यानंतर थेट व्हाॅट्सॲपद्वारे नग्न व्हिडिओ कॉल करून त्याचे रेकॉर्डिंग करतात. रेकॉर्डिंग सोशल मीडियावरीलफेसबुक व यू-ट्यूबवर अपलोड करतो, अशी धमकी देऊन ब्लॅकमेलिंग करीत असल्याचे अनेक प्रकार शहरांमध्ये घडले आहेत. यामध्ये डॉक्टर इंजिनिअरसह अनेक जण फसत असून, इभ्रतीला घाबरून मागेल तेवढे पैसे देत असल्याचे धक्कादायक प्रकार घडले आहेत.

फेसबुकवरून सुंदर मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट येते. ती मुलगी सुंदर असते, तिची रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर काही दिवस चॅटिंग सुरू होते. चॅटिंगनंतर एकमेकांचा पर्सनल मोबाइल नंबर घेतला जातो आणि मग व्हॉट्सॲपवरून हाय-हॅलो, गुडमॉर्निंग, गुड नाइट, असे मेसेज पाठविले जातात. तरुणी आपले सुंदर फोटो व्हाॅट्सॲपला पाठवून तरुणांना भुरळ पाडण्यास सुरुवात करते. नंतर मोबाइलवर बोलणे सुरू होते आणि मग मोबाइलवरील व्हिडिओ कॉलद्वारे एकमेकांसमोर नग्न होण्याची ऑफर देते.

सुंदर मुलीच्या गोड बोलण्याला बळी पडलेला तरुण तयार होतो. दोघेही एकमेकांसमोर नग्न होऊन अश्लील चाळे करतात. हे चाळे सुंदर तरुणी रेकॉर्ड करते आणि त्यानंतर काही वेळेतच संबंधित तरुणाच्या व्हॉट्सॲपला पाठवते. हा व्हिडिओ तुझ्या फेसबुकला किंवा इन्स्टाग्रामला अपलोड करते. यू-ट्यूबला प्रसिद्ध करते, अशी धमकी देण्यास सुरुवात करते. इज्जतीला घाबरून जेव्हा तरुण फेसबुकवरील मैत्रिणीला गयावया करतो तेव्हा ती पैशाची मागणी करते. बऱ्याच लोकांनी फेसबुकवरील सुंदर तरुणीच्या धमकीला घाबरून पैसे भरण्याचे प्रकारही घडले आहेत. मात्र, याप्रकरणी सायबर क्राइमला कोणीही तक्रार देण्यास आलेलं नाही.

शिक्षकाने भरले ४० हजार रुपये

-शहरातील एका मुलींच्या शाळेतील शिक्षकालाही अशा पद्धतीने फेसबुकवरून एका तरुणीने फ्रेंड बनविले होते. नंतर व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ कॉल करून रेकॉर्डिंग केले. व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देऊन एक लाख रुपयांची मागणी केली. शिक्षकाने घाबरून चाळीस हजार रुपये फेसबुकवरील मैत्रिणीच्या खात्यावर जमा केले. मात्र, तिचा जास्त त्रास होऊ लागल्याने त्याची कल्पना देण्यासाठी शिक्षक महाशयांनी सायबर सेल गाठले. घडला प्रकार सांगितला. मात्र, तक्रार देण्यास नकार दिला.

उच्च पदास्थांचीही फसवणूक

- शहरातील काही तरुण मुले अशा प्रकाराला बळी पडली आहेत. नुकतेच लग्न जमलेल्या एका तरुणाने फेसबुकवरील मैत्रिणीला ७० हजार रुपये पाठवून दिले. त्याचे लग्न जमले होते म्हणून तो इज्जतीला घाबरत होता. शेवटी त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. सामाजिक कार्यकर्ते राज सलगर यांनी त्या तरुणाला तणावातून बाहेर काढत धीर दिला आणि आत्महत्येपासून रोखले. हे प्रकार शहरातील डॉक्टर, इंजिनिअर, नोकरदारांसोबत घडले आहेत.

 

नग्न व्हिडिओ रेकॉर्ड करून संबंधित इसमांना ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, याबाबत तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. तक्रार दिल्याशिवाय आम्ही पुढची कारवाई करणार कशी, या प्रकाराला जे बळी पडले आहेत त्यांनी तक्रार द्यावी, आम्ही तपास करू.

- वीसेंद्रसिंग बायस, पोलीस उपनिरीक्षक, सायबर सेल.

Web Title: Beautiful girls chatting from Facebook; Then nude video calls and blackmailing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.